Asim Munir on Pakistan Rare Earth Minerals: आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानची (Pakistan) अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर (Asim Munir) यांनी एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. ‘जंग’ वृत्तपत्रातील एका लेखात त्यांनी दावा केला आहे की, पाकिस्तानमध्ये ‘दुर्मीळ खनिजांचा खजिना’ सापडला आहे.
तसेच, रेको डीक मायनिंग प्रकल्पावरही त्यांनी भर दिला आहे, जो बलुचिस्तान प्रांतात आहे.
एका लेखात जनरल मुनीर म्हणाले, “पाकिस्तानजवळ दुर्मीळ खनिजांचा खजिना आहे. या खजिन्यामुळे पाकिस्तानचे कर्ज कमी होईल आणि लवकरच पाकिस्तानची गणना जगातील सर्वात समृद्ध देशांमध्ये होईल.”
रेको डीक प्रकल्प आणि आंतरराष्ट्रीय संबंध
पाकिस्तानच्या या महत्त्वाकांक्षी योजनेच्या केंद्रस्थानी रेको डीक मायनिंग प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे मूल्य 6.6 अब्ज डॉलर (USD 6.6 billion) असून, पाकिस्तान सरकार कॅनडातील बॅरिक गोल्डसोबत त्याचे व्यवस्थापन करत आहे.
या प्रकल्पासाठी अमेरिका (USA), जागतिक बँक (World Bank) आणि इतर भागीदारांकडून 3.5 अब्ज डॉलरची मदत मागितली जात आहे. रिपोर्टनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आता पाकिस्तानमध्ये अधिक स्वारस्य दाखवत आहेत, कारण अमेरिका आशियातील खनिजांच्या साठ्यांमध्ये आपला प्रवेश वाढवू इच्छित आहे.
मुनीर यांनी जागतिक महासत्तांमध्ये समतोल साधण्याची भूमिका मांडताना म्हटले आहे की, पाकिस्तान एका मित्रासाठी दुसऱ्या मित्राचा त्याग करणार नाही. तसेच, त्यांनी भारतावर पुन्हा एकदा आरोप केला की, भारत पाकिस्तानमधील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तालिबानला देशात ढकलत आहे.
याआधी 2019 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांनीही पाकिस्तानजवळ मोठा तेल साठा सापडल्याचा दावा केला होता, पण तो दावा नंतर खोटा ठरला. त्यामुळे, आता लष्करप्रमुंखांचा हा दावा कितपत खरा ठरतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तसेच, गेल्याकाही दिवसात असीम मुनीर राजकारणात येणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यांनी आपल्याला राजकारणात रस नसल्याचे म्हटले आहे. केवळ देशाची सेवा करायची व शहीद होणे हीच इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.