पहलगाम हल्ल्याचा परिणाम! हानिया अमीर ते माहिरा खानसह अनेक पाकिस्तानी कलाकारांचे इंस्टाग्राम अकाउंट भारतात ब्लॉक

Pak Actors Instagram Accounts Blocked

Pak Actors Instagram Accounts Blocked  | पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांच्या मृत्यूनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर, हानिया अमीर आणि माहिरा खान यांसारख्या अनेक पाकिस्तानी कलाकारांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.

अनेक पाकिस्तानी कलाकारांचे इंस्टाग्राम अकाउंट्स आता भारतातील युजर्ससाठी आता उपलब्ध नाहीत.भारतातील युजर्स जेव्हा या लोकप्रिय पाकिस्तानी कलाकार आणि कंटेंट क्रिएटर्सचे अकाउंट उघडण्याचा प्रयत्न करत आहेत, तेव्हा त्यांना ‘Account not available’ असा संदेश दिसत आहे.

इंस्टाग्राम या अकाउंट्सवर संदेश देत आहे की, “भारतात हे अकाउंट उपलब्ध नाही. कायदेशीर मागणीचे पालन करत आम्ही ही सामग्री प्रतिबंधित केली आहे.” इतर पाकिस्तानी सेलिब्रिटीज ज्यांचे इंस्टाग्राम अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आले आहेत, त्यामध्ये अली जफर, सनम सईद, बिलाल अब्बास, इक्रा अजीज, इम्रान अब्बास आणि सजल अली यांचा समावेश आहे.

दोन दिवसांपूर्वी भारत सरकारने डॉन न्यूज, समा टीव्ही, एआरवाय न्यूज आणि जिओ न्यूज यांसारख्या प्रमुख पाकिस्तानी मीडिया आउटलेट्ससह 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी घातल्यानंतर सोशल मीडियावर ही कारवाई केली आहे.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, हे चॅनेल चिथावणीखोर आणि जातीयदृष्ट्या संवेदनशील सामग्री, खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती आणि भारत, त्याचे सैन्य आणि सुरक्षा संस्थांविरुद्ध चुकीचे दावे प्रसारित करत होते, या कारणास्तव त्यांच्यावर बंदी घालण्यात आली.

दरम्यान, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा गट असलेल्या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ने (TRF) या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे.