Pakistan social media channels | पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात बंदी घालण्यात आलेली पाकिस्तानी सेलिब्रिटींची सोशल मीडिया अकाउंट्स आणि वृत्तसंस्थांची यूट्यूब चॅनेल्स आता पुन्हा उपलब्ध झाली आहेत.
1 जुलै 2025 रोजी मावरा होकेन, युम्ना जैदी, अहद रझा मीर आणि दानिश तैमूर यांसारख्या पाकिस्तानी कलाकारांची इंस्टाग्राम खाती भारतात पुन्हा ॲक्सेस करता येऊ लागली आहेत. तसेच, हम टीव्ही, एआरवाय डिजिटल आणि हर पल जिओ यांसारख्या पाकिस्तानी वृत्तसंस्थांची यूट्यूब चॅनेल्सही स्ट्रीमिंगसाठी खुली झाली आहेत.
मात्र, फवाद खान, माहिरा खान आणि हानिया आमिर यांची खाती अजूनही भारतात बंदच आहेत, असे नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर नमूद केले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानशी संबंधित सोशल मीडिया अकाउंट्, युट्यूब चॅनेल्स भारतात ब्लॉक करण्यात आले होते. मात्र, आता अचानक काही अकाउंट्स भारतीय यूजर्सला दिसत आहेत.
यापूर्वी, 8 मे 2025 रोजी भारत सरकारने माहिती तंत्रज्ञान नियम, 2021 अंतर्गत सर्व ओटीटी आणि डिजिटल स्ट्रीमिंग सेवांना पाकिस्तानशी संबंधित वेब सिरीज, चित्रपट, संगीत आणि पॉडकास्ट हटवण्याचे निर्देश दिले होते. राष्ट्रीय सुरक्षेच्या चिंतेमुळे आणि भारताच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचवणारी सामग्री रोखण्यासाठी ही बंदी घालण्यात आली होती.
यात 16 यूट्यूब चॅनेल्स, तसेच शाहिद आफ्रिदी, शोएब अख्तर, शाहीन आफ्रिदी आणि शोएब मलिक यांसारख्या माजी क्रिकेटपटूंचे इंस्टाग्राम अकाउंट्स/युट्यूब चॅनेल्स ही बंद करण्यात आले होते. आता ही बंदी हटवण्यात आली आहे, पण यामागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
AICWA चा आक्षेप
ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने (AICWA) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या निर्णयावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी म्हटले, “पाकिस्तानी कलाकारांची सोशल मीडिया अकाउंट्स आणि वृत्तसंस्थांची चॅनेल्स भारतात पुन्हा उपलब्ध होणे चिंताजनक आणि अस्वीकार्य आहे. हा आपल्या शहीद जवानांच्या बलिदानाचा अपमान आहे आणि दहशतवादी हल्ल्यात प्रियजन गमावलेल्या भारतीयांवर भावनिक आघात आहे.”