PM Modi Nation Speech | पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील दहशतवादी तळं उद्धवस्त केली. यानंतर भारत आणि पाकमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. अखेर अमेरिकेच्या मध्यस्थीने दोन्ही देशांनी शस्त्रसंधीची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज देशाला संबोधित केले.
भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती आणि ‘ऑपरेशन सिंदूर’वर (Operation Sindoor) भाष्य करताना त्यांनी भारतीय सैन्य दलाच्या शौर्याला सलाम केला आणि गेल्या काही दिवसांत भारतीय सैन्य दलाने दाखवलेल्या शौर्याचा अभिमान व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “आपण सर्वांनी गेल्या काही दिवसांत देशाची ताकद आणि संयम दोन्ही पाहिले आहेत. मी सर्वप्रथम भारताच्या पराक्रमी सैन्याला, सशस्त्र दलांना, आपल्या गुप्तचर संस्थांना, आपल्या शास्त्रज्ञांना प्रत्येक भारतीयाच्या वतीने सलाम करतो.”
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी जे क्रौर्य दाखवले, त्याने देश आणि जगाला हादरवून सोडले. सुट्टीचा आनंद घेत असलेल्या निष्पाप नागरिकांना त्यांचा धर्म विचारून, त्यांच्या कुटुंबासमोर, त्यांच्या मुलांसमोर निर्दयपणे मारले. हे दहशतवादाचे अत्यंत घृणास्पद आणि क्रूर स्वरूप होते. हे देशाच्या सलोख्याला तडा देण्याचा घृणास्पद प्रयत्न होता. माझ्यासाठी वैयक्तिकरित्या ही वेदना खूप मोठी होती. या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश, प्रत्येक राजकीय पक्ष, दहशतवादाविरोधात एकजुटीने उभा राहिला. आम्ही दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण मुभा दिली आहे. आज प्रत्येक दहशतवादी, प्रत्येक दहशतवादी संघटना हे जाणून आहे की, आपल्या बहिणींच्या, मुलींच्या कपाळावरील सिंदूर पुसण्याचे परिणाम काय होतात.”
#WATCH | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा, "कोई भी न्यूक्लियर ब्लैकमेल भारत नहीं सहेगा। न्यूक्लियर ब्लैकमेल की आड़ में पनप रहे आतंकी ठिकानों पर भारत सटीक और निर्णायक प्रहार करेगा… हम आतंक की सरपरस्त सरकार और आतंक के आकाओं को अलग-अलग नहीं देखेंगे…" pic.twitter.com/wxgvPhfVd7
— ANI_HindiNews (@AHindinews) May 12, 2025
पंतप्रधान मोदी म्हणाले, “आपल्या वीर सैनिकांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या उद्दिष्टांसाठी असीम शौर्य दाखवले. मी त्यांचे शौर्य, धैर्य आणि पराक्रम देशातील प्रत्येक माता, बहीण आणि मुलीला समर्पित करतो.”
पंतप्रधान मोदींनी पुढे सांगितले की, “ऑपरेशन सिंदूर हे न्यायाचे अखंड वचन आहे. ६ मे च्या रात्री आणि ७ मे च्या सकाळी संपूर्ण जगाने या वचनाचे रूपांतर निकालात होताना पाहिले. भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणे आणि त्यांच्या प्रशिक्षण केंद्रांवर अचूक हल्ले केले. भारत एवढा मोठा निर्णय घेऊ शकतो, याची दहशतवाद्यांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल. पण जेव्हा देश एकजूट होतो, राष्ट्र प्रथम या भावनेने भरलेला असतो, तेव्हा पोलादी निर्णय घेतले जातात आणि निकाल दाखवले जातात.”
पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान कमालीचा निराश झाला होता. पाकिस्तान बिथरला होता आणि याच बिथरलेल्या अवस्थेत त्यांनी आणखी एक धाडस केले. दहशतवादावरील भारताच्या कारवाईला साथ देण्याऐवजी, पाकिस्तानने भारतावरच हल्ला करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानने आपल्या शाळा, महाविद्यालये, गुरुद्वारा, मंदिरे आणि सामान्य नागरिकांच्या घरांना लक्ष्य केले. त्यांनी आपल्या लष्करी तळांना लक्ष्य केले. यात पाकिस्तान स्वतः उघडा पडला. पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे भारतासमोर गवताच्या काडीप्रमाणे कशी कोसळली, हे जगाने पाहिले. भारताच्या सक्षम हवाई संरक्षण प्रणालीने त्यांना आकाशातच नष्ट केले. पाकिस्तानची तयारी सीमेवर हल्ला करण्याची होती, पण भारताने पाकिस्तानच्या छातीवर हल्ला केला.”
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “…जेव्हा भारतातील क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला, तेव्हा दहशतवादी संघटनांच्या इमारतीच नव्हे, तर त्यांचा आत्मविश्वासही हादरला. बहावलपूर आणि मुरीदकेसारखी दहशतवादी ठिकाणे ही जागतिक दहशतवादाची विद्यापीठे होती. जगात जेवढे मोठे दहशतवादी हल्ले झाले आहेत, त्या सर्वांचे धागेदोरे या दहशतवादी तळांशी जोडलेले आहेत. मग तो ९/११ चा हल्ला असो किंवा भारतात दशकांपासून झालेले मोठे दहशतवादी हल्ले असोत. दहशतवाद्यांनी आपल्या बहिणींच्या कपाळावरील सिंदूर पुसला होता, म्हणून भारताने दहशतवाद्यांची ही मुख्यालये उद्ध्वस्त केली. भारताच्या या हल्ल्यांमध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले.”
पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारताच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी अचूक हल्ला केला आणि पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानतळाचे नुकसान केले, ज्याचा पाकिस्तानला खूप गर्व होता. भारताने पहिल्या ३ दिवसांत पाकिस्तानला इतके मोठे नुकसान पोहोचवले, ज्याचा त्यांना अंदाजही नव्हता. भारताच्या आक्रमक कारवाईनंतर पाकिस्तान वाचण्याचे मार्ग शोधू लागला… याच मजबुरीमुळे १० मे च्या दुपारी पाकिस्तानी सैन्याने आपल्या DGMO शी संपर्क साधला. तोपर्यंत आपण मोठ्या प्रमाणावर दहशतवादी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त केल्या होत्या. पाकिस्तानच्या छातीत वसलेली दहशतवादी ठिकाणे आपण उद्ध्वस्त केली होती. त्यामुळे जेव्हा पाकिस्तानने विनवणी केली की, त्यांच्याकडून कोणतीही दहशतवादी कारवाई किंवा लष्करी धाडस दाखवले जाणार नाही, तेव्हा भारतानेही त्यावर विचार केला.”
पंतप्रधान मोदी म्हणाले, “पाकिस्तानच्या दहशतवादी आणि लष्करी तळांवरील आपली कारवाई आपण फक्त स्थगित केली आहे. येत्या दिवसांत पाकिस्तान काय भूमिका घेतो, यावर आपण लक्ष ठेवू.”
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “भारताची भूमिका स्पष्ट आहे. दहशतवाद आणि व्यापार एकत्र चालू शकत नाहीत आणि पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही. आज मी जागतिक समुदायालाही सांगू इच्छितो की, आमचे धोरण असे आहे की, जर पाकिस्तानशी चर्चा झाली, तर ती फक्त दहशतवादावर होईल, जर पाकिस्तानशी चर्चा झाली, तर ती फक्त पीओकेवर होईल. प्रिय देशवासियांनो, आज बुद्ध पौर्णिमा आहे आणि भगवान बुद्धांनी आपल्याला शांतीचा मार्ग दाखवला आहे. शांतीचा मार्गही शक्तीतून जातो. मानवता शांती आणि समृद्धीकडे वाटचाल करो, प्रत्येक भारतीय शांततेने जगू शकेल, विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करू शकेल, यासाठी भारताचे शक्तिशाली असणे खूप आवश्यक आहे. गरज पडल्यास या शक्तीचा वापर करणेही आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांत भारताने हेच केले आहे. मी पुन्हा एकदा भारतीय सैन्य आणि सशस्त्र दलांना सलाम करतो.”
“भारतीय तिन्ही सैन्य दल सतर्क आहेत. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकनंतर आता ‘ऑपरेशन सिंदूर’ हे दहशतवादाविरोधात भारताचे धोरण आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ने एक नवी रेषा आखली आहे… जर भारतावर हल्ला झाला, तर त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल, आम्ही आमच्या पद्धतीने, आमच्या अटींवर उत्तर देऊ.”, असे मोदी पुढे म्हणाले.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “कोणतीही आण्विक धमकी भारत सहन करणार नाही. आण्विक ब्लॅकमेलच्या नावाखाली वाढणाऱ्या दहशतवादी तळांवर भारत अचूक आणि निर्णायक हल्ला करेल… आम्ही दहशतवादाला पाठीशी घालणारे सरकार आणि दहशतवादाचे सूत्रधार यांना वेगळे मानणार नाही…”
“…निश्चितच हे युग युद्धाचे नाही, पण हे युग दहशतवादाचेही नाही. दहशतवादाविरोधात ‘शून्य सहनशीलता’ (zero tolerance) हे एका चांगल्या जगाची हमी आहे.”, असेही देशाला संबोधित करताना मोदी म्हणाले.