‘गाझातील परिस्थिती चिंताजनक, शांतता हाच पर्याय’, पंतप्रधान मोदींनी BRICS परिषदेत व्यक्त केले मत

PM Modi Speech At BRICS Summit

PM Modi Speech At BRICS Summit | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी BRICS परिषदेच्या (BRICS Summit) शांतता आणि सुरक्षा सत्रात गाझामधील (Gaza) मानवीय संकटावर चिंता व्यक्त केली. पंतप्रधान मोदींनी ब्रिक्स परिषदेला संबोधित करत विविध मुद्यांवर भाष्य केले. त्यांनी गाझातील परिस्थितीवर भाष्य करत शांततेचा मार्ग हाच मानवतेच्या कल्याणासाठी एकमेव पर्याय असल्याचे अधोरेखित केले.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करताना त्यांनी दहशतवादाविरोधात कठोर भूमिका मांडली आणि मित्र देशांना सहकार्याची हमी दिली.

मोदी म्हणाले की, “जागतिक शांतता आणि सुरक्षा ही केवळ आदर्श नाही, तर आपल्या भविष्याचा आधार आहे. पश्चिम आशियापासून युरोपपर्यंत, जग आज वाद आणि तणावांनी वेढले आहे. गाझामधील मानवीय परिस्थिती अत्यंत चिंतेची आहे.” त्यांनी भारताला बुद्ध आणि गांधींची भूमी संबोधत युद्ध आणि हिंसाचाराला स्थान नसल्याचे सांगितले.

दहशतवादाविरोधात ठाम भूमिका

मोदींनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत त्याला “भारताच्या आत्मा आणि ओळखीवरील हल्ला” असल्याचे यावेळी म्हटले. 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता.

पहलगाम हल्ल्याबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, “या दुःखाच्या प्रसंगी, आमच्यासोबत उभे राहिलेल्या, पाठिंबा आणि सहानुभूती व्यक्त करणाऱ्या मित्र देशांचे मी मनापासून आभार मानतो. दहशतवादाचा निषेध करणे हे आपले ‘तत्त्व’ असावे, केवळ ‘सोयीची’ गोष्ट नाही,”

मोदी पुढे म्हणाले, “दहशतवाद्यांवर निर्बंध लादण्यास कोणताही संकोच नसावा. दहशतवादाचे बळी आणि त्याचे समर्थक यांना एकाच तराजूत तोलता येणार नाही. वैयक्तिक किंवा राजकीय फायद्यासाठी, दहशतवादाला मूक संमती देणे, दहशतवादाला किंवा दहशतवाद्यांना पाठिंबा देणे, कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नसावे.”

दरम्यान, सध्या ब्रिक्स परिषद ब्राझीलमध्ये 7 ते 9 जुलै 2025 या कालावधीत होत आहे. यामध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेसोबतच नवीन सदस्य देश इजिप्त, इथिओपिया, इराण, यूएई आणि इंडोनेशियाचे नेते सुद्धा सहभागी होत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी 2026 मध्ये भारतात होणाऱ्या पुढील ब्रिक्स शिखर परिषदेसाठी सर्व सदस्य राष्ट्रांना निमंत्रण दिले आहे.