PM Modi Inaugurates New Pamban Bridge | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रामनवमीच्या शुभमुहूर्तावर देशाच्या अभियांत्रिकी क्षमतेचे प्रतीक ठरलेला नवीन पंबन पूल (New Pamban Bridge) राष्ट्राला समर्पित केला. हा भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज (Vertical Lift Sea Bridge) आहे.
उद्घाटनाच्या प्रसंगी पंतप्रधानांनी भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाला हिरवा झेंडा दाखवला. हेयासोबतच रामेश्वरम–तांबरम (Rameswaram–Tambaram, Chennai) दरम्यान धावणाऱ्या नवीन रेल्वेगाडीचाही शुभारंभ झाला.
श्रीलंकेत तीन दिवसांचा दौरा पूर्ण केल्यानंतर मोदी थेट तामिळनाडूत दाखल झाले. त्यांनी रामेश्वरम येथील रामनाथस्वामी मंदिरात पूजा केली. त्यानंतर सुमारे 8,300 कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या रेल्वे व रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन केले.
नवीन पंबन पूल 2.07 किलोमीटर लांब आहे. तो पाल्क सामुद्रधुनीवर उभारण्यात आला आहे. या पुलामुळे रामेश्वरम बेट आणि मुख्य भूभागातील मंडपम (Mandapam) यांच्यामधील जोड अधिक मजबूत झाली आहे.
रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) या नवरत्न कंपनीने हा पूल बांधला आहे. त्यासाठी सुमारे ₹700 कोटी खर्च करण्यात आले.
या पुलामध्ये 72.5 मीटर लांबीचा नेव्हिगेशनल स्पॅन आहे. हा भाग आवश्यकतेनुसार 17 मीटर उंचीपर्यंत उचलता येतो. त्यामुळे मोठ्या जहाजांना पुलाखालून सहज मार्ग मिळतो. हा पूल ताशी 80 किमी वेगाने गाड्या धावू शकतील, अशा क्षमतेचा आहे. पूल दोन रेल्वे मार्गांसाठी तयार करण्यात आला आहे. सध्या तो एकाच मार्गावर कार्यरत आहे.
माहितीनुसार, हा पुढील सुमारे 100 वर्ष सुरक्षित राहील. त्यात आधुनिक अभियांत्रिकी तंत्र वापरण्यात आले आहे. गंज रोखण्यासाठी स्टेनलेस स्टील रिइन्फोर्समेंट, पूर्णपणे वेल्डेड सांधे, आणि पॉलिसिलोक्सेन कोटिंग वापरले गेले आहे.
या पुलाची तुलना गोल्डन गेट ब्रिज (Golden Gate Bridge – USA), टॉवर ब्रिज (Tower Bridge – UK) आणि ओरेसंड ब्रिज (Oresund Bridge – Denmark–Sweden) यांसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुलांशी होत आहे.
जुना पंबन पूल 1914 मध्ये बांधण्यात आला होता. त्यामध्ये हाताने चालवल्या जाणाऱ्या शेरझर स्पॅन तंत्रज्ञानाचा वापर होता. तो पूल आता सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आला आहे.