PM Modi Speaks To Vladimir Putin: गेल्याकाही दिवसांपासून व्यापारावरून भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले गेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतीय वस्तूंवर 50 टक्के आयात शुल्क लावल्याचा निर्णय घेतल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (PM Modi Speaks To Vladimir Putin) यांच्याशी फोनवर संवाद साधला.
या चर्चेत दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याचा निर्धार मोदी यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनी या चर्चेबाबत सोशल मीडियावर माहिती दिली.
मोदींनी सांगितले की, माझे मित्र पुतीन यांच्याशी “अत्यंत चांगली आणि सविस्तर चर्चा” झाली. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या 23 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी पुतीन यांचे भारतात स्वागत करण्यास आपण उत्सुक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. युक्रेनमधील (Ukraine) ताज्या घडामोडींची माहिती दिल्याबद्दल मोदींनी पुतीन यांचे आभार मानले.
युक्रेन संघर्षावर भारताची भूमिका
सरकारकडून आपल्या अधिकृत निवेदनात युक्रेन संघर्षावर भारताची सातत्यपूर्ण भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. भारत या संघर्षाचे शांततापूर्ण निराकरण करण्याच्या बाजूने आहे, असे त्यांनी सांगितले.
भारताने रशिया आणि युक्रेनला चर्चेतून हा संघर्ष संपवण्याचे आवाहन केले आहेदोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय अजेंड्याच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि भारत-रशिया विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी अधिक वाढवण्याचा संकल्प केला.
अमेरिकेच्या आयात शुल्कामुळे तणाव वाढला
ट्रम्प यांनी रशियाकडून कच्चे तेल आयात केल्याबद्दल भारतावर 25 टक्के शुल्क लावले. यानंतर काही दिवसांतच मोदी आणि पुतीन यांच्यातील हा फोन कॉल महत्त्वाचा मानला जात आहे. भारताने अमेरिकेच्या दुटप्पीपणावर टीका करूनही ट्रम्प यांनी आणखी 25 टक्के शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. भारताने रशियाकडून तेल आयात करण्याच्या आपल्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे.