‘शांततेत भाकरी खा, नाहीतर गोळी खा…, पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा

PM Narendra Modi

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) नंतर पहिल्यांदाच गुजरात (Gujarat) राज्याचा दौरा केला. कच्छ येथे आयोजित सभेत त्यांनी पाकिस्तान विरोधात कडक शब्दांत इशारा दिला. शांततेत भाकरी खा, नाहीतर माझी गोळी आहेच, असा थेट इशाराच त्यांनी यावेळी बोलताना पाकिस्तानला दिला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “पाकिस्तानला दहशतवादाच्या आजारातून मुक्त करण्यासाठी आता तिथल्या जनतेने आणि विशेषतः तरुणांनी पुढे यावे लागेल. शांततेचं जीवन जगावं, भाकरी खा… नाहीतर माझी गोळी आहेच!”

मोदी पुढे म्हणाले की, भारताचं दहशतवादाविरोधात धोरण पूर्णतः ‘शून्य सहनशीलतेचे’ आहे. “ऑपरेशन सिंदूरने हे ठाम धोरण पुन्हा अधोरेखित केलं आहे. जो कोणी भारतीय नागरिकांच्या रक्तावर डोळा ठेवेल, त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना कोणतीही सूट मिळणार नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी भारतात पर्यटन क्षेत्राचा विकास आणि त्यातून निर्माण होणाऱ्या रोजगार संधींचाही उल्लेख केला. “कच्छसारखा परिसर इतिहास, संस्कृती आणि निसर्गाने समृद्ध आहे. येथे मोठ्या प्रमाणात पर्यटन वाढेल आणि स्थानिकांना रोजगारही मिळेल. भारत पर्यटनावर विश्वास ठेवतो, पण पाकिस्तान दहशतवादालाच पर्यटन मानतो. हे जगासाठी मोठं संकट आहे,” अशी टीका मोदींनी केली.

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून दहशतवाद्यांवर कारवाई होईल, असा विश्वास वाटत होता, पण तसे झाले नाही, असे सांगत मोदी म्हणाले, “9 मे च्या रात्री पाकिस्तानने जेव्हा नागरिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आमच्या सैन्याने जोरदार प्रत्युत्तर देत त्यांचे हवाई तळ उद्ध्वस्त केले. त्यांच्या हवाई तळांची स्थिती अजूनही ICU मध्ये आहे.”

मोदी शेवटी म्हणाले, “आमच्या सैन्याच्या शौर्यामुळे पाकिस्तानने पांढरा झेंडा (white flag) दाखवला. आम्ही स्पष्ट केलं होतं की आमचं लक्ष्य दहशतवादी तळ आहेत. पण तुम्ही गप्प राहायला हवे होते. आता चूक केली आहे, तर परिणाम भोगा.”