मोदी सरकारचा मोठा निर्णय! सीबीआय संचालक प्रवीण सूद यांचा कार्यकाळ वाढवला

Praveen Sood CBI Director Extension

Praveen Sood CBI Director Extension | केंद्रीय अन्वेषण विभागाचे (Central Bureau of Investigation – CBI) संचालक प्रवीण सूद (Praveen Sood) यांच्या कार्यकाळात 24 मे 2025 नंतर एक वर्षाची वाढ करण्यात आली आहे. ते या दिवशी निवृत्त होणार होते, मात्र, आता केंद्र सरकारने त्यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे.

7 मे रोजी जारी केलेल्या सरकारी अधिसूचनेत म्हटले आहे की, “नियुक्ती समितीने समितीच्या शिफारशींच्या आधारावर प्रवीण सूद, आयपीएस यांना केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक म्हणून 24.05.2025 नंतर एक वर्षाचा कार्यकाळ वाढवण्यास मान्यता दिली आहे.”

प्रवीण सूद यांनी 25 मे 2023 रोजी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संचालकपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांची दोन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती.

सीबीआय संचालकांच्या कार्यकाळात वाढ करण्याचा निर्णय सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील उपस्थित होते. रिपोर्टनुसार, राहुल गांधी यांनी सूद यांच्या कार्यकाळ वाढवण्यास मान्यता दिली नाही.

सीबीआय संचालकांची नियुक्ती केंद्र सरकारद्वारे तीन सदस्यीय समितीच्या शिफारशीवर केली जाते. या समितीचे अध्यक्ष पंतप्रधान असतात आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश यांचा त्यात समावेश असतो.

प्रवीण सूद कोण आहेत?

प्रवीण सूद हे कर्नाटक कॅडरचे 1986 बॅचचे भारतीय पोलीस सेवेतील (IPS) अधिकारी आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली, तेव्हा ते कर्नाटकचे पोलीस महासंचालक (DGP) म्हणून कार्यरत होते.

1964 मध्ये हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात जन्मलेले सूद यांनी दिल्लीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर 22 व्या वर्षी आयपीएसमध्ये प्रवेश केला. ते बंगळूरु येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि न्यूयॉर्कमधील सिरॅक्यूज युनिव्हर्सिटीच्या मॅक्सवेल स्कूल ऑफ गव्हर्नन्सचे पदव्युत्तर पदवीधर देखील आहेत.

प्रत्यक्ष कामावर लक्ष केंद्रित करणारे अधिकारी म्हणून ओळखले जाणारे सूद यांनी उच्च नेट-वर्थ व्यक्ती आणि आंतरराज्यीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या गुंतागुंतीच्या प्रकरणांच्या तपासाचे पर्यवेक्षण केले आहे. तंत्रज्ञानात पारंगत असलेल्या या प्रवीण सूद यांनी कर्नाटक पोलिसात न्यायपालिका सोबत CCTNS (Crime and Criminal Tracking Network and Systems) आणि ICJS (Interoperable Criminal Justice System) प्रणाली मजबूत करण्यासाठी काम केले आहे.