चंदीगड- हरियाणातील गुरुग्राममध्ये राधिका यादव (Radhika Yadav) या टेनिसपटूची तिच्या वडिलांनी गोळ्या झाडून हत्या (Murder) केली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान रीलवरील आक्षेपार्ह प्रतिक्रियांमुळे वडिलांनी तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे. राधिकाने तिच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवर ही रील (reel) शेअर केली होती. यात ती इनामुल हक या तरुणासोबत अभिनय करताना त्याच्या खांद्यावर डोके ठेवून बसलेली दिसते. ही रील पाहिल्यानंतर लोकांनी आक्षेपार्ह प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली.
वझिराबादमधील सेक्टर ५७, फेज-२ येथील सुशांत लोक येथील रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष पवन यादव यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राधिका नावाच्या तरुणीच्या एका रीलवर काही लोकांनी आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिल्या, त्यामुळे तिच्या कुटुंबात वाद निर्माण झाला आणि तिला तिचं सोशल मीडिया अकाउंट बंद करावे लागले. या व्हिडिओतील तिचा सह-अभिनेता इनामुल याने सांगितले की, शूटिंगपूर्वी त्याने राधिकाला गाणे पाठवले होते आणि राधिकाने सांगितलं होतं की, तिच्या वडिलांना ते गाणं आवडलं आहे. त्यानंतर गाण्याचे चित्रीकरण झाले. हे गाण २० जून रोजी रिलीज झाले, पण त्याच दरम्यान राधिकाच्या आजोबांचे निधन झाल्यामुळे तिने गाण्याचं प्रमोशन केले नाही. काही दिवसांनी तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर रील अपलोड केली. ही रील पाहून तिच्या कुटुंबातील ओळखीच्या लोकांनी आक्षेप घेतला आणि त्याखाली टीका केली. ही बाब तिच्या वडिलांपर्यंत पोहोचताच घरात वाद निर्माण झाला.