ट्रम्प यांच्या ‘भारतीय अर्थव्यवस्था मृत’ वक्तव्यावरून राहुल गांधींना घरचा आहेर, पक्षातील नेत्यांनीच व्यक्त केले वेगळे मत

ahul Gandhi

Rahul Gandhi on Indian Economy: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला ‘मृत’ संबोधले होते. भारत आणि रशियावर टीका करताना त्यांनी दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था मृतावस्थेत असल्याचे म्हटले होते. त्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi on Indian Economy) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर टीका केली. मात्र, हा प्रयत्न त्यांच्यासाठी महागात पडला आहे. त्यांच्याच पक्षातील आणि मित्रपक्षांच्या नेत्यांनी ट्रम्प यांच्या मताला विरोध दर्शवला

पक्षांतर्गत मतभेद

राहुल गांधींनी ट्रम्प यांच्या वक्तव्याला समर्थन देत केंद्र सरकारवर नोटबंदी आणि वस्तू-सेवा कर यांच्यासाठी दोष दिला. त्यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग नष्ट झाल्याचा आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप केला. पण त्यांचे पक्षाचे ज्येष्ठ नेते शशी थरूर आणि राजीव शुक्ला यांनी भारतीय अर्थव्यवस्था चांगली असल्याचे मत व्यक्त केले आहे.. थरूर यांनी अमेरिकेच्या अवास्तव मागण्यांना नकार देण्याचा सल्ला दिला, तर शुक्ला यांनी ट्रम्प यांच्या वक्तव्याला चुकीचे ठरवले आहे.

ट्रम्प यांच्या वक्तव्यावर बोलताना थरूर म्हणाले की, आमची युरोपियन युनियनशी (EU) चर्चा सुरू आहे, आम्ही ब्रिटनसोबत (UK) आधीच एक करार केला आहे आणि इतर देशांशीही बोलणी करत आहोत. जर आपण अमेरिकेत स्पर्धा करू शकत नसू, तर आपल्याला आपली बाजारपेठ अमेरिकेबाहेर वाढवावी लागेल. आपल्याकडे इतर पर्याय आहेत. आपल्याकडे चांगली आणि मजबूत देशांतर्गत बाजारपेठ आहे. आपल्या वाटाघाटी करणाऱ्यांना शक्य तेवढा सर्वोत्तम करार करण्यासाठी आपण जोरदार पाठिंबा दिला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

तर राज्यसभा खासदार राजीव शुक्ला यांनी ट्रम्प यांचे वक्तव्य “पूर्णपणे चुकीचे” असल्याचे म्हटले. “आपली आर्थिक स्थिती अजिबात कमकुवत नाही. जर कोणी आम्हाला आर्थिकदृष्ट्या संपवू शकतो असा दावा करत असेल तर तो गैरसमज आहे. ट्रम्प भ्रमात जगत आहेत,

मित्रपक्षांचा विरोध

शिवसेना पक्षाच्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही ट्रम्प यांच्यावर टीका केली. त्यांनी सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्था जगातील पहिल्या पाचमध्ये आहे आणि हे वक्तव्य अहंकार किंवा अज्ञानातून आले आहे. त्यांनी असा दावा केला की, ट्रम्प हे करारासाठी दबाव टाकत आहेत.

ट्रम्प यांचे आणखी वक्तव्य

भारतावर 25 टक्के शुल्क जाहीर केल्यानंतर ट्रम्प यांनी रशियासोबतच्या भारताच्या व्यवहारांना लक्ष्य केले. त्यांनी म्हटले की, त्यांना भारत-रशिया व्यवहाराची पर्वा नाही आणि दोन्ही देशांनी आपली मृत अर्थव्यवस्था सोबत घेऊन बुडावे. त्यांनी भारताबरोबर व्यापार कमी असल्याचे आणि शुल्क जास्त असल्याचेही सांगितले. तसेच, अमेरिकेने भारतावर 25 टक्के अतिरिक्त आयात शुल्क लादले आहे.