Pahalgam Attack | जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर पाकिस्तानसोबत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. “भारतावर वाईट नजर टाकणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देणे ही माझी जबाबदारी आहे,” असे राजनाथ सिंह म्हणाले.
या दहशतवादी हल्ल्यात सीमेपलीकडील दहशतवाद्यांचा हात असल्याचा आरोप भारताने केला आहे. “पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. देशाला जे वाटते तसेच उत्तर दिले जाईल. याची मी तुम्हाला खात्री देतो,” असे राजनाथ सिंह यांनी देशाला पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची गरज वाटत असल्याचे नमूद करताना म्हटले.
“संरक्षणमंत्री म्हणून, माझ्या सैनिकांसोबत काम करणे आणि देशाच्या सीमांचे संरक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे. आणि आपल्या देशावर वाईट नजर टाकणाऱ्यांना सशस्त्र दलांसोबत काम करून चोख प्रत्युत्तर देणे ही माझी जबाबदारी आहे,” असे राजनाथ सिंह म्हणाले. राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याची आता चर्चा रंगली आहे.
दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) लोक चांगले ओळखतात आणि त्यांच्या कामाची पद्धत, त्यांचा निर्धार आणि जीवनात “धोका पत्करण्याची” त्यांची शिकलेली पद्धत लोकांना चांगलीच माहीत आहे.
पंतप्रधान मोदींनी अलीकडेच संरक्षण अधिकाऱ्यांना सांगितले होते की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात भारताच्या जवाबी कारवाईची पद्धत, लक्ष्य आणि वेळ निश्चित करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य सशस्त्र दलांना आहे. पंतप्रधान मोदींनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख यांच्यासह उच्चस्तरीय संरक्षण अधिकाऱ्यांच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवताना हे विधान केले होते.
बैठकीत मोदी म्हणाले, ‘दहशतवादाला सडेतोड प्रत्युत्तर देणे हा आपला राष्ट्रीय संकल्प आहे.’ पंतप्रधान मोदींनी सशस्त्र दलांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला. या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा आणि त्यांच्या म्होरक्यांना त्यांच्या कल्पनेपलीकडील कठोर शिक्षा देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान, फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा येथील हल्ला, 2016 मध्ये उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे आता पहलगाम येथील हल्ल्यानंतर सरकार काय कारवाई करणार याकडून नागरिकांचे लक्ष आहे.