कोलकाता – विधी महाविद्यालयात विद्यार्थिनींवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना ताजी असतानाच आता अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या आयआयएम कोलकाता या महाविद्यालयात अन्य एका शैक्षणिक संस्थेत शिकणार्या विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना उघड झाली आहे. विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकणारा परमानंद टोपौनवार याला अटक केल्याने खळबळ उडाली आहे.
पीडितेच्या तक्रारीनुसार, परमानंद याने तिला काही शैक्षणिक कामात मदत करण्याच्या बहाण्याने आयआयएम कोलकातामध्ये बोलावले. पीडिता महाविद्यालयात गेली तेव्हा परमानंद प्रवेशद्वारावर उभा होता. त्याने तिला रजिस्टरमध्ये नावाची नोंद करू नको, असे सांगितले. त्यानंतर तो तिला मुलांच्या वसतिगृहात नेले. तिथे परमानंद याने तिला पिझ्झा आणि पाणी दिले. तो पिझ्झा खाल्ल्यानंतर पीडिता बेशुध्द झाली. त्यानंतर परमानंद याने तिच्यावर बलात्कार केला.या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. आरोपी परमानंद हा मूळचा कर्नाटकमधील आहे.
