Robert Vadra: काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra) यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आरोपपत्रात जमीन गैरव्यवहारातून 58 कोटी रुपयांची बेकायदेशीर कमाई केल्याचा आरोप केला आहे. Robert Vadraकाँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आरोपपत्रात जमीन गैरव्यवहारातून 58 कोटी रुपयांची बेकायदेशीर कमाई केल्याचा आरोप केला आहे.
ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, रॉबर्ट वाड्रा यांना गुरुग्राममधील जमीन गैरव्यवहारातून 58 कोटी रुपये मिळाले. ही रक्कम त्यांनी स्थावर मालमत्ता खरेदी, गुंतवणूक आणि त्यांच्या कंपन्यांची देणी फेडण्यासाठी वापरली, असा दावा आहे. सूत्रांनी सांगितले की, वाड्रा यांनी राजकीय संबंधांचा फायदा घेऊन हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा यांच्याकडून सवलती मिळवल्या.
परवाना आणि हस्तांतरण
ईडीच्या म्हणण्यानुसार, वाड्रा यांच्या स्काय लाईट हॉस्पिटॅलिटी कंपनीला शिकोहपूर येथील 3.53 एकर जमिनीसाठी व्यावसायिक परवाना नियमांचे उल्लंघन करून देण्यात आला. ही जमीन ओंकारेश्वर प्रॉपर्टीजने कोणत्याही आर्थिक व्यवहाराशिवाय हस्तांतरित केली. वाड्रा यांनी प्रभावाचा वापर करून परवाना मिळवून दिल्याचा आणि लाच म्हणून ही जमीन मिळाल्याचा आरोप आहे.
डीएलएफसोबतचा व्यवहार
या प्रकरणात 2008 ते 2012 या काळात स्काय लाईट हॉस्पिटॅलिटी आणि डीएलएफ रिटेल डेव्हलपर्समधील करार महत्त्वाचा आहे. यातून वाड्रा यांच्या कंपन्यांना 58 कोटी रुपये मिळाले. 2008 मध्ये 5 कोटी, 2009 मध्ये 10 आणि 35 कोटी, तर 2012 मध्ये 8 कोटी रुपये मिळाले. हे पैसे बेकायदेशीर परवान्यामुळे गुन्ह्यातून मिळालेली कमाई असल्याचे ईडीने आरोपपत्रात म्हटले आहे. या रकमेचा वापर डीएलएफ मॅग्नोलिया, बेस्टेक बिझनेस टॉवर्स आणि राजस्थानमधील शेतजमिनी खरेदी करण्यासाठी झाला.
अंमलबजावणी संचालनालयाच्या म्हणण्यानुसार, वाड्रा यांनी अनेक व्यवहारांमध्ये थेट सहभाग नसल्याचे सांगितले आहे आणि दिवंगत सहकाऱ्यांवर जबाबदारी ढकलली आहे.