Rene Joshilda Bomb Threat Hoax | एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या एका 30 वर्षीय रोबोटिक्स इंजिनिअर तरुणीने आपल्या प्रियकराला फसवण्यासाठी संपूर्ण देशभरात बॉम्ब हल्ल्याच्या खोट्या धमक्यांचे षडयंत्र रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रेनी जोशिन्डा (Rene Joshilda) असे या आरोपी महिलेचे नाव आहे.
अहमदाबाद सायबर क्राईम पोलिसांनी (Ahmedabad Cyber Crime Police) जटिल तपासानंतर तिला चेन्नईतून अटक केली. रेनी एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ सल्लागार म्हणून काम करते.
एकतर्फी प्रेमाचा सूड
पोलिसांनुसार, रेनीचे तिचा सहकारी दिविज प्रभाकर याच्यावर एकतर्फी प्रेम होते. बंगळूरुतील एका प्रकल्पादरम्यान त्यांची भेट झाली, परंतु प्रभाकरने तिचे प्रेम नाकारले. 2025 च्या सुरुवातीला प्रभाकरने दुसऱ्या मुलीशी लग्न केल्यानंतर रेनीने सूड उगवण्याचे ठरवले. तिने प्रभाकरला फसवण्यासाठी बनावट ईमेल आयडी तयार केले, ज्यापैकी काही त्याच्याच नावाने होते, आणि त्याद्वारे बॉम्ब धमक्या पाठवल्या.
3 जून ते जून 2025 पर्यंत रेनीने गुजरात, दिल्ली, तामिळनाडू, महाराष्ट्र, केरळ आणि राजस्थानसह 11 राज्यांतील 21 प्रमुख संस्थांना बॉम्ब धमक्यांचे ईमेल पाठवले. यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम, जिनेव्हा लिबरल स्कूल आणि बीजे मेडिकल कॉलेज यांचा समावेश होता. काही धमक्या धार्मिक कार्यक्रम किंवा महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटींशी जुळवल्या होत्या. एका ईमेलमध्ये तिने लिहिले, “नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये बॉम्ब ठेवला आहे. वाचवू शकत असाल तर वाचवा.”
एअर इंडियाच्या AI-171 विमान अपघातानंतर तिने आणखी एक खोटा दावा केला, “आम्ही एअर इंडियाचे विमान पाडले. आता तुम्हाला कळेल की आम्ही खेळ करत नाही.”
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि एक चूक
रेनीने व्हर्च्युअल नंबर, व्हीपीएन, डार्क वेब आणि टॉर ब्राउझरचा वापर करून आपली ओळख लपवली. मात्र, एकदा तिने तिच्या मूळ आणि बनावट ईमेल खात्यांमध्ये एकाच डिव्हाइसवरून लॉगिन केले. या चुकीमुळे तिचा आयपी ॲड्रेस धमक्यांशी जोडला गेला, ज्याने पोलिसांना तिच्यापर्यंत पोहोचण्यास मदत झाली.
अहमदाबाद सायबर क्राईम पोलिसांनी देशभरातील सायबर युनिट्सच्या सहकार्याने रेनीला चेन्नईतील तिच्या घरातून अटक केली. तिच्या घरातून जप्त उपकरणे आणि डिजिटल रेकॉर्डमधून पुरावे मिळाले आहे. रेनी सध्या पोलीस कोठडीत असून, तपास सुरू आहे.