Tsunami In Russia-Japan: रशियाच्या (Russia Earthquake) पूर्वेकडील कामचटका द्वीपकल्पाजवळ आज (30 जुलै) सकाळी 8.8 तीव्रतेचा भूकंप झाला. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) च्या माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्रबिंदू जमिनीपासून 20 किलोमीटर खोलवर होते आणि ते पेट्रोपावलोव्स्क-कामचात्स्की शहरापासून 119 किलोमीटर दूर होते.
हा भूकंप इतका शक्तिशाली होता की त्याच्या धक्क्यांमुळे समुद्रात त्सुनामीसारख्या (Tsunami In Russia-Japan) उंच लाटा उसळल्या. यामुळे रशियासह जपान, अमेरिका आणि न्यूझीलंडनेही तातडीने त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. या भूकंपाचे जोरदार धक्के बसल्यानंतर जपान आणि रशियाच्या किनारपट्टीवर त्सुनामीच्या उंच लाटा धडकल्या, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
जपानमध्ये अलर्ट, किनारपट्टीच्या भागात 9 लाख नागरिक हलवले
जपानच्या हवामान विभागाने या भूकंपानंतर होक्काइडोपासून वाकायामा किनारपट्टीपर्यंत त्सुनामीचा गंभीर इशारा दिला आहे. किनाऱ्यावर उंच लाटा धडकत आहेत. त्यामुळे सुमारे 9 लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. जपानमधील तोहोकू, चिबा आणि ओसाका या भागांमध्ये सायरन वाजवून तातडीचा अलर्ट जारी करण्यात आला.
FIRST waves of tsunami hitting town of Severo-Kurilsk, Russia
— RT (@RT_com) July 30, 2025
Coastal buildings in JEOPARDY https://t.co/PHmWoI73KO pic.twitter.com/34TL8jNjDH
रशियातील शहरात पाणी शिरले, सेवा बंद
रशियाच्या सेवेरो-कुरील्स्क आणि येलिजोवो जिल्ह्यांमध्ये त्सुनामीमुळे किनारपट्टीच्या भागात पाणी शिरल्याची माहिती समोर आली आहे. अनेक इमारती जलमय झाल्या असून, वीज आणि मोबाईल नेटवर्क कोसळले आहेत. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना उंच भागाकडे स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे.
अमेरिका, हवाई आणि न्यूझीलंडमध्येही अलर्ट
या भूकंपाचा परिणाम प्रशांत महासागरात अनेक देशांवर होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या अलास्का, हवाई व ग्वाममध्ये त्सुनामी वॉच जारी करण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. हवाईमध्ये लष्करी पातळीवर सायरन वाजवले गेले असून लोकांना उंच भागांमध्ये हलवले जात आहे.
न्यूझीलंडच्या हवामान खात्यानेही किनाऱ्यालगतच्या भागांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
1952 नंतरचा सर्वात मोठा धक्का
कामचटका परिसरात याआधी 1952 मध्ये 9.0 तीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हानी झाली होती. सध्याचा भूकंप हा त्या स्तराच्या जवळ असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. विशेष म्हणजे गेल्या एक महिन्यात कामचटकामध्ये हा सहावा मोठा भूकंप आहे. काही आठवड्यांपूर्वी येथे 7.4 तीव्रतेचे धक्के बसले होते.