Russia Ukraine Talks Proposed | भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावानंतर अखेर दोन्ही देश शस्त्रसंधीसाठी तयार झाले आहेत. त्यामुळे दोन्ही देशातील युद्ध सध्या तर टळले आहे. एकीकडे भारत-पाकमधील तणाव कमी होत असताना रशिया-युक्रेनमध्ये देखील शस्त्रसंधी होण्याची शक्यता आहे.
गेल्या 3 वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धात (Russia-Ukraine War) पहिल्यांदाच सकारात्मक वळण आले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी 15 मे रोजी इस्तंबूलमध्ये युक्रेनसोबत थेट शांतता चर्चेचा प्रस्ताव मांडला आहे.
रविवारी क्रेमलिनमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना पुतिन म्हणाले, “आम्ही युद्ध संपवून कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करू इच्छितो.” त्यांनी स्पष्ट केले की, रशिया आणि युक्रेन यांच्यात अंतिम संवाद 2022 मध्ये झाला होता, पण त्या चर्चेला युक्रेननेच पूर्णविराम दिला होता. आता मात्र रशिया कोणतीही पूर्वअट न ठेवता थेट चर्चा करण्यास तयार आहे.
या पार्श्वभूमीवर चार युरोपीय देश – ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि पोलंडयांनी रशियावर दबाव वाढवत 30 दिवसांच्या युद्धबंदीचा प्रस्ताव मांडला आहे. याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी देखील पाठिंबा दिला असून, त्यांनी याला “दोन महान देशांसाठी महान दिवस” असे संबोधले.
ट्रम्प म्हणाले, “या चर्चेमुळे लाखो निरपराध नागरिकांचे प्राण वाचू शकतात. अमेरिका आता युद्ध नव्हे, तर पुनर्निर्माण व व्यापारावर लक्ष केंद्रित करेल.” त्यांनी दोन्ही देशांसोबत शांततेसाठी काम सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव्ह (Dmitry Peskov) यांनी सांगितले की, युरोपियन देशांच्या प्रस्तावाचा रशिया गांभीर्याने विचार करेल.
रशिया-युक्रेन संघर्षाने जगात इंधन, अन्नसुरक्षा आणि जागतिक शांततेवर गंभीर परिणाम केला आहे. त्यामुळे आता सुरू होणारी ही थेट चर्चा केवळ दोन्ही देशांसाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी महत्त्वाची ठरणार आहे. या चर्चेनंतर दोन्ही देशातील युद्ध थांबणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.