Japan Earthquake Prediction | जपानमध्ये (Japan) सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. याचे कारण ठरले आहे एका कॉमिक बुकमध्ये करण्यात आलेली भविष्यवाणी. रियो तात्सुकी (Ryo Tatsuki) यांच्या कॉमिक बुकमध्ये 5 जुलै 2025 रोजीच्या त्सुनामीच्या भविष्यवाणीमुळे सध्या जपामध्ये भीतीचे वातावरण आहे.
या भविष्यवाणीमुळे पर्यटकांनी जपान प्रवास रद्द करण्यास सुरुवात केली आहे. विमान कंपन्यांना देखील याचा फटका बसला आहे. जपान सरकारने सुनामीचा इशारा दिलेला नसला तरी सतर्कता बाळगली आहे.
रियो तात्सुकींची भविष्यवाणी
जपानच्या ‘बाबा वेंगा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रियो तात्सुकी यांनी 1999 साली आलेल्या ‘द फ्युचर आय सॉ’ या मांगा (जपानमधील कॉमिक्स) पुस्तकात मध्ये 5 जुलै 2025 रोजी जपानमध्ये भीषण त्सुनामी येईल, असा दावा केला होता. त्यांनी यापूर्वी तोहोकू भूकंप, कोरोना महामारी आणि प्रिन्सेस डायनाच्या मृत्यूसारख्या घटनांचे अचूक भाकीत केले होते.
त्यांच्या पुस्तकात 5 जुलै 2025 रोजी जपान आणि फिलीपीन्स दरम्यान समुद्राच्या तळाला भेग पडेल आणि 2011 च्या तोहोकू भूकंपापेक्षा तिप्पट तीव्र सुनामी येईल, असे म्हटले आहे. त्यांच्या यापूर्वीच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत, त्यामुळे यावेळीही लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर पर्यटक आपले प्रवास पुढे ढकलत आहेत.
1999 मध्ये प्रकाशित झाले होते पुस्तक
रियो तात्सुकी यांनी मांगा पुस्तकात म्हटले आहे की, मार्च 2011 मध्ये आलेल्या ग्रेट ईस्ट जपान भूकंपापेक्षा तीनपट अधिक तीव्रतेची सुनामी जपानच्या दक्षिण-पश्चिमेला येईल. तात्सुकी यांचे मांगा पुस्तक ‘द फ्युचर आय सॉ’ प्रथम 1 जुलै 1999 रोजी प्रकाशित झाले होते. हे त्यांच्या स्वप्नांचे आणि डायरी नोंदींचे एक संग्रह आहे, जे ग्राफिक स्वरूपात प्रकाशित करण्यात आले आहे.
काही वर्षांपूर्वी ते पुन्हा प्रकाशित करण्यात आले. 2011 मध्ये तोहोकू येथे आलेल्या मोठ्या भूकंप आणि सुनामीनंतर ‘द फ्युचर आय सॉ’ ला खूप लोकप्रियता मिळाली. या विनाशकारी घटनेत 18 हजारांहून अधिक लोकांचा जीव गेला होता.
भूकंपांची मालिका
टोकियोपासून 1200 किमी दक्षिण-पश्चिमेस असलेल्या कागोशिमा प्रांतातील टोकारा बेटावर गेल्या दोन आठवड्यांत एक हजारहून अधिक भूकंपांचे धक्के नोंदवले गेले. रिक्टर स्केलवर 5.5 तीव्रतेचे आणि जपानच्या 7-बिंदू स्केलवर 6 तीव्रतेचे धक्के आकुसेकी बेटावर जाणवले. यामुळे जुन्या इमारतींना तडे जाण्याचा धोका आहे. जपान सरकार सतर्क असून, महाभूकंप किंवा सुनामीच्या शक्यतेसाठी तयारी करत आहे, पण अद्याप सुनामीचा इशारा जारी झालेला नाही.
पर्यटनावर परिणाम
रियो तात्सुकी यांच्या भविष्यवाणीमुळे पर्यटन उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे. हाँगकाँगमधून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत 11% घट झाली आहे. अनेक पर्यटक जुलै-ऑगस्टमधील प्रवास पुढे ढकलले आहेत. एअरलाइन कंपन्यांनीही सतर्कता बाळगली असून, तिकिटे रद्द होत आहेत.