हवेत असतानाच निखळली विमानाची खिडकी, गोवा-पुणे उड्डाणादरम्यान घडली घटना; व्हिडिओ व्हायरल

SpiceJet Plane

SpiceJet Plane | अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेनंतर सातत्याने विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातच आता गोव्यावरून ते पुण्याला येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानातील एका खिडकीचा आतील फ्रेम हवेत असताना निखळल्याची घटना समोर आली आहे,

या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर कोणताही परिणाम झाला नसला तरीही याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एअरलाइनने माहिती दिली की, विमान पुण्यात उतरल्यानंतर मानक देखभाल प्रक्रियेनुसार ही फ्रेम पुन्हा बसवण्यात आला. या घटनेनंतर एका प्रवाशाने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत विमानाच्या हवाई योग्यतेवर प्रश्न उपस्थित केला.

स्पाइसजेटचे स्पष्टीकरण

स्पाइसजेटने सांगितले की, क्यू400 विमानातील एक आतील खिडकीची फ्रेम उड्डाणादरम्यान सैल झाली आणि निखळली. ही फ्रेम केवळ सावलीसाठी (शेड) वापरला जाणारा नॉन-स्ट्रक्चरल भाग होता, ज्याचा विमानाच्या सुरक्षिततेशी काहीही संबंध नाही.

“विमानाच्या खिडक्या अनेक स्तरांच्या काचांनी बनलेल्या असतात, ज्यात बाहेरील मजबूत काच दाब सहन करते. त्यामुळे अशा घटनेतही प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येत नाही,” असे एअरलाइनने निवेदनात म्हटले. उड्डाणादरम्यान केबिनमधील दाब सामान्य राहिला आणि विमानाला कोणतेही नुकसान झाले नाही.

एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करत विमानाच्या हवाई योग्यतेवर शंका व्यक्त केली. “गोवा ते पुणे स्पाइसजेटच्या उड्डाणात खिडकीचा आतील भाग हवेतच निखळला. हे विमान आता जयपूरला जाणार आहे. याची हवाई योग्यता आहे का?” असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले, ज्यात त्यांनी विमान वाहतूक नियामक डीजीसीएला टॅग केले. या पोस्टमुळे स्पाइसजेटच्या देखभाल प्रक्रियांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

स्पाइसजेटने त्वरित प्रतिक्रिया देत सांगितले की, निखळलेला फ्रेम हा विमानाच्या संरचनेशी संबंधित नसून, केवळ सजावटीचा भाग होता. पुण्यात उतरल्यानंतर तांत्रिक तपासणी करून हा भाग दुरुस्त करण्यात आला आणि विमान पुढील उड्डाणासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. एअरलाइनने डीजीसीएला याबाबत कळवले असून, सर्व नियामक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जात असल्याचा दावा केला आहे.