ब्रिटनच्या सर्वात पॉवरफुल  F-35B फायटर जेटला ‘दे धक्का’, तांत्रिक बिघाडानंतर आता हँगरमध्ये हलवले; पाहा व्हिडिओ

F35B Fighter Jet

F35B Fighter Jet | केरळमधील तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या महिन्यात आपत्कालीन लँडिंग केलेले ब्रिटिश रॉयल नेव्हीचे अत्याधुनिक F-35B फायटर जेट (F35B Fighter Jet) आता एअर इंडियाच्या हँगरमध्ये (Air India hangar) हलवण्यात आले आहे. 110 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त किंमतीचे हे जगातील सर्वात प्रगत लढाऊ विमानांपैकी एक मानले जाते.

कोट्यावधी रुपये खर्चून निर्मिती केलेल्या या फायटर जेटला तांत्रिक बिघाडामुळे हँगरमध्ये हलवण्यात आले आहे. विमानाला हँगरमध्ये घेऊन जाताना व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. येथे यूके रॉयल एअर फोर्सची तांत्रिक टीम विमानाची दुरुस्ती करून परत नेण्याचा प्रयत्न करेल.

रिपोर्टनुसार, यूके रॉयल एअर फोर्सची 25 सदस्यीय तांत्रिक टीम तिरुवनंतपुरम विमानतळावर पोहोचली आहे. या तज्ञांची जबाबदारी अडकलेल्या F-35 जेटची संपूर्ण पाहणी करून त्याची दुरुस्ती करण्याची आहे.

आपत्कालीन लँडिंगचे कारण

14 जून रोजी ब्रिटिश F-35B फायटर जेटला मध्य-उड्डाणात इंधन कमी झाल्याने आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते. पायलटने इंधन कमी झाल्याचे कळवले आणि तत्काळ उतरण्याची परवानगी मागितली होती. तेव्हापासून हे फायटर जेट तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावरच होते.

प्रोटोकॉलनुसार, यूकेच्या अभियंत्यांची टीम तिरुवनंतपुरम विमानतळावर पोहोचल्यानंतर रविवारी ब्रिटिश F-35B फायटर जेटला हँगरमध्ये हलवण्यात आले. यूकेच्या अधिकाऱ्यांनी भारतीय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या मेंटेनन्स, रिपेअर अँड ओव्हरहॉल सुविधेची ऑफर स्वीकारली.

ब्रिटिश उच्चायुक्तांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “यूके भारतीय अधिकारी आणि विमानतळ संघांच्या सततच्या पाठिंब्याबद्दल आणि सहकार्याबद्दल खूप आभारी आहे.”