Tamil Nadu Governor Jay Shri Ram Controversy | तामिळनाडूचे (Tamil Nadu) राज्यपाल आर.एन. रवी (Tamil Nadu Governor R.N. Ravi) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच त्यांना तब्बल 3 वर्षांहून अधिक काळ 10 विधेयकांना मंजुरी न देणाऱ्या निर्णयावरून फटकारले असताना, आता ते “जय श्री राम” नारा (Tamil Nadu Governor Jay Shri Ram Controversy) देण्यास विद्यार्थ्यांना उद्युक्त केल्याच्या आरोपाने चर्चेत आले आहेत.
हा कथित प्रकार एका शैक्षणिक कार्यक्रमात घडल्याचे समोर आले असून, यावर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी आणि काही शैक्षणिक संस्थांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. एसपीसीएसएस-टीएन (State Platform for Common School System – Tamil Nadu) या संस्थेने तर रवी यांना राज्यपालपदावरून हटवण्याची मागणी केली आहे.
संस्थेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “राज्यपाल आर.एन. रवी यांनी आपल्या पदाची शपथ मोडली असून त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या कलम 159 चे जाणीवपूर्वक उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांना तातडीने पदावरून हटवण्यात यावे.”
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ससिकिरण सेंथिल (Sasikanth Senthil) यांनी ‘एक्स’ या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत राज्यपालांची कडाडून टीका केली. त्यांच्या मते, “सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यावर आणि राज्य सरकारने दबाव आणल्यावर आता राज्यपाल विद्यार्थ्यांमार्फत ‘जय श्री राम’चा नारा देऊ पाहत आहेत. ते स्पष्टपणे निराश असून लोकशाही संस्थांना बगल देत आपला अजेंडा पुढे रेटत आहेत. हा अहंकार आणि संस्थात्मक अपमानाचा धोकादायक संगम आहे.”
या आठवड्याच्या सुरुवातीस सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) राज्यपाल रवी यांचा निर्णय बेकायदेशीर आणि मनमानी असल्याचे ठरवत 10 विधेयकांवरील त्यांची नकारात्मक भूमिका रद्द केली होती. न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले की, विधेयके पुन्हा सादर झालेल्या तारखेपासून ती मंजूर झालेली मानली जातील.
हे देखील वाचा – तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय, राज्यपालांच्या संमतीशिवाय 10 कायदे लागू