अमित शहांची मोठी घोषणा, भाजप-AIADMK युती जाहीर; 2026 मध्ये तामिळनाडू विधानसभा निवडणूक एकत्र लढणार

BJP-AIADMK Alliance

BJP-AIADMK Alliance | पुढील वर्षी होणाऱ्या तामिळनाडू विधानसभा निवडणूक भाजप (BJP) आणि AIADMK एकत्र लढवणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी चेन्नईमध्ये या युतीची घोषणा केली. त्यांनी स्पष्ट घोषणा करत सांगितले की, 2026 मधील तमिळनाडू विधानसभा निवडणूक भाजप (BJP) आणि AIADMK एकत्र लढवणार आहे.

तसेच, या युतीचे नेतृत्व ई. पलानीस्वामी (E. Palaniswami) करतील. AIADMK चे प्रमुख असलेल्या पलानीस्वामी यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही मोठी राजकीय घोषणा करण्यात आली.

या घोषणेमुळे गेल्या अनेक आठवड्यांपासून सुरू असलेल्या अटकळांना पूर्णविराम मिळाला आहे. विशेष म्हणजे, या निर्णयाच्या काही तासांपूर्वीच नयनार नागेंद्रन (Nainar Nagendran) हे तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष असतील हे जवळपास निश्चित झाले.

नागेंद्रन हे के. अन्नामलाई (K. Annamalai) यांची जागा घेणार आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर भाजप-AIADMK युती अधिक औपचारिक आणि निश्चित झाली आहे.

शहा म्हणाले, “ही निवडणूक राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली आणि तमिळनाडूत ई. पलानीस्वामी व AIADMK यांच्या नेतृत्वात लढली जाईल.” AIADMK ही 1998 पासून एनडीए (NDA) चा भाग असल्याचे सांगताना त्यांनी माजी मुख्यमंत्री जे. जयललिता (Jayalalithaa) आणि मोदी यांच्यातील पूर्वीच्या सहकार्याची आठवण करून दिली.

शहा यांनी स्पष्ट शब्दांत ई. पलानीस्वामी यांचाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार असल्याचे संकेत दिले. “आम्ही ई. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवू,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

शहा पुढे म्हणाले की, “AIADMK ने आमच्याकडे कोणतीही अट ठेवलेली नाही. जागावाटपाबाबत निर्णय नंतर घेतला जाईल.” त्यांनी NDA युतीच्या मजबुतीवर विश्वास व्यक्त करत सांगितले की, “आम्ही 2014 मध्ये NDA म्हणून 37 लोकसभा जागा जिंकल्या, त्यापैकी 30 जागा BJP-AIADMK युतीने मिळवल्या होत्या. ही युती पुन्हा विजय मिळवेल आणि तामिळनाडूत NDA सरकार स्थापन होईल.”