Tej Pratap Yadav Post | राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) पक्षाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी काही दिवसांपूर्वी मोठे पुत्र तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. एका सोशल मीडिया पोस्टमुळे बेजबाबदार वर्तनाच्या आरोपाखाली त्यांचे पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आले होते. आता तेज प्रताप यादव यांनी त्यांचे आई-वडील, लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी (Rabri Devi) हेच त्यांचे जग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काही ‘लोभी’ लोकांनी त्यांच्याविरुद्ध ‘राजकारण’ केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
तेज प्रताप यांनी ‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्टमध्ये म्हटले आहे, “माझे प्रिय आई-बाबा, तुम्हीच माझे जग आहात. तुम्ही आणि तुमच्या सूचना देवापेक्षाही मोठ्या आहेत. तुम्ही असाल तर माझ्याकडे सर्वकाही आहे. मला फक्त तुमचे प्रेम आणि विश्वास हवा आहे. बाबांशिवाय हा पक्ष अस्तित्वात नसता, तसेच माझ्याविरुद्ध राजकारण करणारे ते लोभी लोकही नसते. आई-बाबा, नेहमी निरोगी आणि आनंदी राहा.”
मेरे प्यारे मम्मी पापा….
— Tej Pratap Yadav (@TejYadav14) May 31, 2025
मेरी सारी दुनिया बस आपदोनों में ही समाई है।भगवान से बढ़कर है आप और आपका दिया कोई भी आदेश।आप है तो सबकुछ है मेरे पास।मुझे सिर्फ आपका विश्वास और प्यार चाहिए ना कि कुछ और।पापा आप नही होते तो ना ये पार्टी होती और ना मेरे साथ राजनीति करने वाले कुछ जयचंद जैसे…
37 वर्षीय तेज प्रताप यांनी त्यांच्याविरुद्ध काम करणाऱ्यांवर ‘जयचंद’ (Jaichand) असा आरोप केला. १२ व्या शतकातील गहडवाल वंशाचा राजा जयचंद याला पृथ्वीराज रासो या महाकाव्यात विश्वासघातकी म्हणून चित्रित केले आहे, ज्याने पृथ्वीराज चौहान यांच्याविरुद्ध परकीय शक्तींशी हातमिळवणी केली होती. ‘जयचंद’ हा शब्द विश्वासघातकी म्हणून ओळखला जातो.
तेज प्रताप यांच्या पोस्टमध्ये त्यांच्या कुटुंबातील कोणाचेही नाव नसले तरी, त्यांच्या ‘जयचंद’ टीकेचा रोख लालू प्रसाद यादव यांच्या हकालपट्टीच्या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्या कुटुंबातील सदस्यांवर असू शकतो.
तेज प्रताप यादव यांना फेसबुक पोस्टमुळे पक्षातून काढून टाकण्यात आले आहे.त्यांनी फेसबुक अकाउंटवर एका महिलेसोबत फोटो शेअर करत अनेक वर्षांपासून सोबत असल्याचे म्हटले आहे. या पोस्टमध्ये महिलेची ओळख अनुष्का यादव अशी करण्यात आली होती आणि तेज प्रताप आणि तिचे १२ वर्षांपासूनचे नाते असल्याचे म्हटले होते.
“मी तेज प्रताप यादव आणि या फोटोत माझ्यासोबत दिसणारी मुलगी अनुष्का यादव आहे. आम्ही गेल्या 12 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो आणि एकमेकांवर खूप प्रेम करतो. आम्ही या वर्षांमध्ये नात्यात होतो. मला हे तुमच्या सर्वांसोबत खूप दिवसांपासून शेअर करायचे होते, पण योग्य शब्द सापडत नव्हते. आज या पोस्टद्वारे मी माझे मन तुमच्यासमोर उघड करत आहे. मला आशा आहे की तुम्ही सर्वजण समजून घ्याल,” असे त्यात लिहिले होते.
ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यांनी त्यांचे प्रोफाइल हॅक (hacked) झाल्याचा दावा केला होता. मात्र, त्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी तेज प्रताप यांची पक्ष आणि कुटुंबात कोणतीही भूमिका राहणार नसल्याचे स्पष्ट केले होते.