कोण आहे Miss World 2025 चा ताज जिंकणारी थायलंडची ओपल सुचता चुआंग्सरी? जाणून घ्या

Opal Suchata Chuangsri

Miss World 2025 | थायलंडच्या (Thailand) ओपल सुचता चुआंग्सरीने (Opal Suchata Chuangsri) हैदराबाद येथे पार पडलेल्या भव्य अंतिम सोहळ्यात मिस वर्ल्ड 2025 (Miss World 2025) स्पर्धेचा प्रतिष्ठित मुकुट पटकावला आहे. तिने इथियोपियाच्या हॅसेट डेरेजे एडमास्सूला मागे टाकत हा ताज मिळवला. हा थायलंडसाठी या स्पर्धेतील पहिलाच विजय ठरला आहे.

या सोहळ्यात चुआंग्सरीने फुलांनी सजलेला, उपचार आणि सामर्थ्य यांचं प्रतीक असलेला पांढरा गाऊन परिधान केला होता. मावळती मिस वर्ल्ड आणि चेक प्रजासत्ताकच्या क्रिस्टीना पिश्कोव्हा (Krystyna Pyszkova) हिने तिला मुकुट बहाल केला.

भारताच्या नंदिनीला अंतिम आठमध्येही स्थान नाही

यंदा भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नंदिनी गुप्ताला अंतिम आठ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवता आले नाही. मागील वर्षी भारताच्या सिनी शेट्टी ही अंतिम आठमध्ये पोहोचली होती. भारताने यापूर्वी सहा वेळा मिस वर्ल्डचे विजेतेपद मिळवले असून, शेवटची विजेती मानुषी छिल्लर होती.

कोण आहे ओपल सुचता चुआंग्सरी ?

30 सप्टेंबर 2003 रोजी थायलंडच्या फुकेत येथे जन्मलेली ओपल सुचता चुआंग्सरी हॉटेल व्यावसायिक कुटुंबात वाढली. काजोंकिएत्सुक्सा व त्रियाम उडॉम सुक्सा या शाळांत शिक्षण घेत असताना तिने संवाद कौशल्य आणि सांस्कृतिक प्रावीण्य विकसित केलं.

ती थाई, इंग्रजी आणि चिनी भाषांमध्ये पारंगत आहे आणि आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासात असून भविष्यात राजदूत होण्याचं स्वप्न बाळगते. मानसशास्त्र आणि मानवशास्त्र या विषयांचीही तिला आवड आहे. तिने “ओपल फॉर हर” (Opal For Her) हे स्त्रियांच्या आरोग्यप्रश्नांवर केंद्रित सामाजिक अभियान 16 व्या वर्षी सुरू केलं, जे स्तनाच्या कर्करोगाच्या लवकर निदानासाठी समर्पित आहे.

चुआंग्सरीची ‘ब्युटी विथ अ पर्पज’ (Beauty with a Purpose) ही संकल्पना मिस वर्ल्ड स्पर्धेच्या न्यायाधीशांना भावली. तिचं म्हणणं होतं की, “मला वाटतं मिस वर्ल्डचा किताब मिळाल्यानंतर, मी माझं सामाजिक कार्य मोठ्या स्तरावर नेऊ शकेन आणि अनेक प्रकल्पांना हातभार लावू शकेन.”

विशेष म्हणजे, 22 एप्रिल 2025 रोजी ती मिस वर्ल्ड थायलंड ठरली आणि केवळ आठवडाभरातच 72 व्या मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी भारतात दाखल झाली. याआधी तिने मिस युनिव्हर्स 2024 मध्ये तिसरी उपविजेती म्हणून आपलं स्थान मिळवलं होतं आणि “व्हॉइस फॉर चेंज – सिल्व्हर” पुरस्कारही पटकावला होता.