Pahalgam Terror Attack | पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (The Resistance Front – TRF) या दहशतवादी गटाने पहलगाम दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) आपला सहभाग नाकारला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी याच गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, यानंतर खोऱ्यात काश्मिरी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू झाली.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर भारत सरकारकडून कठोर पावले उचलली जात आहेत. त्यातच आता टीआरएफ या दहशतवादी गटाने हल्ल्यातील सहभाग नाकारला आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने २०२३ मध्ये TRF ला दहशतवाद पसरवणे, दहशतवाद्यांची भरती करणे, घुसखोरी सुलभ करणे आणि पाकिस्तानमधून जम्मू-काश्मीरमध्ये शस्त्रे आणि अमली पदार्थांची तस्करी करणे या आरोपांखाली बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) कायद्यान्वये “दहशतवादी संघटना” म्हणून घोषित केले आहे.
“TRF पहलगाम घटनेत कोणताही सहभाग नसल्याचे स्पष्टपणे नाकारते. या कृत्याचे TRF ला दिलेले कोणतेही श्रेय खोटे आणि घाईगर्दीचे आहे,” असे या दहशतवादी संघटनेने एका निवेदनात म्हटले आहे.
दहशतवादी संघटनेने पुढे सांगितले की, पहलगाम हल्ल्यानंतर लगेचच त्यांच्या एका डिजिटल प्लॅटफॉर्मवरून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारा एक “अनधिकृत” संदेश पोस्ट करण्यात आला होता.
“आंतरिक तपासणीनंतर, आम्हाला खात्री आहे की हे एका सुनियोजित सायबर हल्ल्याचे परिणाम होते. आम्ही या उल्लंघनाचा माग काढण्यासाठी पूर्ण तपास करत आहोत आणि प्राथमिक संकेत भारतीय सायबर गुप्तचर यंत्रणेकडे निर्देश करतात,” असेही त्यांनी म्हटले आहे. TRF ने एक ऑडिओ क्लिपही जारी केली आहे, ज्यामध्येही त्यांनी आपला सहभाग नाकारला आहे.
TRF काय आहे?
दिल्लीस्थित थिंक टँक असलेल्या साउथ एशिया टेररिझम पोर्टलच्या माहितीनुसार, TRF ची स्थापना 2019 मध्ये झाली आणि हा पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाचा एक उपगट आहे. रिपोर्टनुसार भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, TRF सोशल मीडिया आणि ऑनलाइन मंचांवर ‘कश्मीर रेझिस्टन्स’ या नावाने ओळखले जाते आणि याच गटाने भारतीय कश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.
अमेरिकेने विदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेले लष्कर-ए-तैयबा हा इस्लामी गट भारतात आणि पश्चिमेकडील हल्ल्यांच्या षड्यंत्रात सहभागी असल्याचा आरोप आहे, ज्यात नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्याचाही समावेश आहे.
भारताच्या गृह मंत्रालयाने 2023 मध्ये संसदेला सांगितले होते की, हा गट जम्मू-कश्मीरमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि नागरिकांच्या हत्यांच्या योजनांमध्ये सहभागी होता. मंत्रालयाने असेही सांगितले की, या गटाने दहशतवाद्यांच्या भरती आणि सीमेपलीकडून शस्त्रे आणि अमली पदार्थांच्या तस्करीचे समन्वय साधला होता. सरकारने या गटाला “दहशतवादी संघटना” म्हणून घोषित केले आहे.