गिरनार रोप वे बंद; पर्यटकांमध्ये नाराजी

Tourists unhappy over Girnar Ropeway closure


अहमदाबाद – मंदिराला जोडणारा आशिया खंडातील (Asia) सर्वात जास्त लांबीचा रोप वे अशी ओळख असलेला गिरनार (Girnar) पर्वतावरील जुनागढ रोप वे (Ropeway) प्रतिकूल हवामान आणि वादळी वाऱ्यांमुळे तूर्त बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये कमालीची नाराजी आहे.


जुनागढमधील गिरनार पर्वत हा हिंदू धर्मात पवित्र मानला जातो. गिरनारच्या छोट्या छोट्या टेकड्यांना दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. येथील अंबाजी मंदिर हे भाविकांचे श्रध्दास्थान आहे. गिरनार रोप वे बंद ठेवण्यात आल्याने शेकडो पर्यटक आणि भाविकांनी आखलेल्या योजनांवर पाणी फेरले गेले.


उषा ब्रेको लिमिटेड या कंपनीच्या वतीने जुनागढ रोप वेचे व्यवस्थापन केले जाते. गेले चार दिवस कंपनीने हा रोप वे बंद ठेवला आहे. यासंदर्भात बोलताना व्यवस्थापक कुलबीरसिंग बेदी यांनी सांगितले की, रोप वे केवळ पर्यटकांच्या सुरक्षेसाठी बंद ठेवला आहे.गेले काही दिवस येथील हवामान प्रतिकूल आहे. ताशी ५०-५४ किलोमीटर वेगाने वारे वहात आहेत. हा वेग सुरक्षा मर्यादेबाहेर आहे. त्यामुळे रोप वे काही दिवसांसाठी बंद ठेवला आहे.