हत्तीणीच्या प्रसुतीसाठी रेल्वे दोन तास थांबली

Train halted for over two hours as pregnant elephant delivers calf on the tracks


रांची – मानव आणि जंगली हत्ती (Wild elephant) यांच्यातील संघर्षाबाबत देशात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या झारखंडमधून मानवी सहिष्णुतेचे एक सुखद उदाहरण समोर आले आहे. येथे एक गर्भार हत्तीण जंगलातून जाणाऱ्या रेल्वे मार्गावर विव्हळत होती. तिला प्रसुती कळा असह्य झाल्या होत्या.तिची ती अवस्था जाणून वनरक्षकाने वेळीच रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या मार्गावरील रेल्वे गाडया काही वेळासाठी थांबवण्याची विनंती केली. रेल्वे प्रशासनानेही मानवतेचे दर्शन घडवत त्या मार्गावरील रेल्वे वाहतूक तब्बत दोन तास रोखून ठेवली.


ही घटना दोन आठवड्यांपूर्वीची असली तरी ती नुकतीच माध्यमांसमोर आली आहे.राज्यातील बरकाकाना आणि हजारीबाग या रेल्वे स्थानकादरम्यान (Barkakana and Hazaribagh railway stations) ही घटना घडली. हा रेल्वेमार्ग जंगलातून जातो.या मार्गावरून केवळ माल वाहतूक करणाऱ्या मालगाड्या ये-जा करतात. रात्रपाळीवरील वनरक्षक या परिसरात गस्त घालत होता. पहाटेचे पावणेतीन वाजले होते. गस्त घालताना हा कर्मचारी रेल्वेमार्गाजवळ आला असता त्याला एक गर्भार हत्तीण रेल्वे रुळावर विव्हळत असल्याचे दिसले. काही वेळात ती प्रसूत होणार हे त्याने ताडले. अशा परिस्थितीत तिला तेथून दूर करणे तिच्या आणि तिच्या पिल्लासाठी धोक्याचे ठरू शकले असते. त्यामुळे या कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखून रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना परिस्थितीची कल्पना दिली. या मार्गावरील रेल्वे वाहतूक काही वेळासाठी थांबवण्याची विनंती केली.त्याच वेळी या मार्गावरून कोळसा वाहून नेणारी एक मालगाडी चालली होती. रेल्वे अधिकाऱ्यांनी मोटरमनला गाडी जागीच थांबवण्याची सूचना दिली. गाडी तब्बल दोन तास जागीच थांबली आणि अखेर हत्तीणीने पिल्लाला जन्म दिला. काही वेळाने ती पिल्लासह रेल्वे रूळापासून दूर निघून गेली. त्यानंतर ती मालगाडी मार्गस्थ झाली.


ही घटना विशेष अशासाठी आहे की जंगली हत्तींनी केलेल्या हल्ल्यांत या राज्यात मागील पाच वर्षांत ४७४ जणांचा बळी गेला आहे. याबाबत झारखंड हे राज्य ओडिशानंतर दुसऱ्या स्थानी आहे.