Donald Trump Business In India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ((Donald Trump) हे गेल्याकाही दिवसांपासून व्यापार करारावरून भारतावर निशाणा साधत आहे. भारतावर 50 टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा त्यांनी केली आहे. एकीकडे त्यांनी भारताला डेड इकॉनॉमी म्हटले आहे, पण भारतातूनच (Donald Trump Business In India) त्यांची कंपनी मोठी कमाई करत असल्याचे समोर आले आहे.
ट्रम्प यांच्या कुटुंबाच्या नियंत्रणाखालील द ट्रम्प ऑर्गनायझेशन या कंपनीने भारतीय बाजारातून कोट्यावधी रुपयांची कमाई केली आहे. भारताला सर्वात मोठी बाजारपेठ मानून कंपनीने गेल्या दशकात 175 कोटी रुपये कमावले आहेत. मुंबई, पुणे, कोलकाता आणि गुरुग्राममधील सात रिअल इस्टेट प्रकल्पांतून ही कमाई झाली आहे.
द ट्रम्प ऑर्गनायझेशन या कंपनीची स्थापना डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. 2017 ला कंपनीचे सीईओपद सोडले होते. आता ट्रस्टच्या माध्यमातून या कंपनीचे कामकाज चालते व याची जबाबदारी ट्रम्प यांची मुलं डॉनल्ड ट्रम्प जूनियर आणि एरिक ट्रम्प यांच्याकडे आहे.
भारतातील विस्तार
5 नोव्हेंबर 2024 रोजी ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून त्यांच्या कंपनीचा भारतातील विस्तार वाढला आहे. गेल्या आठ महिन्यांत द ट्रम्प ऑर्गनायझेशनने भारतीय भागीदार ट्रिबेका डेव्हलपर्ससोबत सहा नवीन प्रकल्पांची घोषणा केली आहे. हे प्रकल्प गुरुग्राम, पुणे, हैदराबाद, मुंबई, नोएडा आणि बंगळूरू येथे आहेत, ज्यामधून 80 लाख चौरस फूट क्षेत्र विकसित होईल.
2012 मध्ये ट्रम्प ब्रँडने भारतात पहिला प्रकल्प सुरू केला होता. 2024 पर्यंत 30 लाख चौरस फूट क्षेत्र विकसित झाले होते. नवीन सहा प्रकल्पांमुळे हा विस्तार चारपट वाढून 1.10 कोटी चौरस फूट होईल. यापैकी गुरुग्राम, पुणे आणि हैदराबादमधील तीन प्रकल्प यंदा सुरू झाले आहेत. ट्रिबेका डेव्हलपर्सने या प्रकल्पांतून 15 हजार कोटी रुपयांची विक्री अपेक्षित असल्याचे सांगितले आहे. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.
द ट्रम्प ऑर्गनायझेशन बांधकामात थेट गुंतवणूक करत नाही, तर आपल्या ब्रँडच्या नावाने परवाना देते. यासाठी आगाऊ शुल्क किंवा विक्रीतील 3 ते 5 टक्के हिस्सा मिळतो. भारतात रिलायन्स इंडस्ट्रीज, लोढा ग्रुप, M3M ग्रुप, पंचशील रिॲल्टी, युनिमार्क ग्रुप आणि IRA इन्फ्रा या कंपन्या भागीदार आहेत. ट्रिबेका डेव्हलपर्स ही कंपनीची अधिकृत भागीदार आहे.
ट्रम्प यांच्या भारतातील 13 प्रकल्पांपैकी दोन पूर्ण झाले आहेत, दोन अंतिम टप्प्यात आहेत आणि तीन सुरुवातीच्या टप्प्यात आहेत. दोन प्रकल्पांची घोषणा होणे बाकी आहे, तर दोन प्रकल्प सध्या थांबलेले आहेत.