Greta Thunberg | इस्रायली सैन्याने गाझाला मदत पोहोचवण्याच्या मार्गावर असताना आपले ‘अपहरण’ केल्याचा दावा पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने (Greta Thunberg) केला आहे. यावर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ग्रेटाने ‘ॲंगर मॅनेजमेंट क्लास’ (Anger Management Class) घेण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने दावा केला आहे की, गाझामध्ये मानवतावादी मदत घेऊन जात असताना इस्रायली लष्कराने आपले आणि इतर कार्यकर्त्यांचे अपहरणकेले. ‘फ्रीडम फ्लोटिला’ (Freedom Flotilla) या मोहिमेचा भाग असलेल्या ‘मॅडलिन’ या जहाजातून ती सिसिली (Sicily) येथून गाझाकडे निघाली होती. हे जहाज महिलांच्या गरजेच्या स्वच्छता वस्तू, अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तू घेऊन निघाले होते.
या घटनेनंतर थनबर्ग हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत सांगितले की, आंतरराष्ट्रीय सागरी सीमेत इस्रायलशी संबंधित सैन्याने तिचे अपहरण केले आहे. तिने स्वीडन सरकारला स्वतःला व सहकाऱ्यांना सोडवण्यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी थनबर्गच्या दाव्यावर खोचक प्रतिक्रिया दिली. एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, “ती एक रागीट तरुणी आहे, तिने ॲंगर मॅनेजमेंट क्लास घ्यावा, हाच माझा सल्ला आहे. इस्रायलला ग्रेटा थनबर्गचे अपहरण करावे लागेल इतकी वाईट परिस्थिती नाही.”
इस्रायली परराष्ट्र मंत्रालयाने ‘फ्रीडम फ्लोटिला’चा उल्लेख ‘सेल्फी यॉट’ असा करत सांगितले की सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. त्यांना सँडविच आणि पाणी दिले जात आहे. त्यांनी जहाजाला इस्रायली किनाऱ्याकडे वळवले असून तिथेच त्यांना नेले जात आहे.
इस्रायलने यापूर्वीच सांगितले होते की, कोणीही गाझावरील नाकेबंदी मोडण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना रोखण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील.