Donald Trump Tariff on India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर (India) पुन्हा एकदा आयात शुल्क (Donald Trump Tariff on India) वाढवण्याचा इशारा दिला आहे. याआधी देखील त्यांनी वारंवार भारतावरील आयात शुल्क वाढवण्याचा इशारा दिला होता. तसेच, रशियाकडून भारत तेल खरेदी करत असल्यावरून देखील टीका केली होती.
CNBC शी बोलताना ट्रम्प म्हणाले की, “पुढच्या 24 तासांत मी भारतावरील शुल्क मोठ्या प्रमाणात वाढवू शकतो.” रशियन तेल आणि लष्करी उत्पादनांच्या खरेदीमुळे भारतावर हे शुल्क वाढवण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.
ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला की, भारतीय बाजारपेठेत अमेरिकन वस्तूंवर जगातील सर्वाधिक शुल्क लावले जाते. ट्रम्प म्हणाले, “भारत एक चांगला व्यापारी भागीदार नाही, कारण ते आमच्यासोबत मोठा व्यापार करतात, पण आम्ही त्यांच्यासोबत व्यापार करत नाही. त्यामुळे आम्ही 25 टक्के शुल्क निश्चित केले होते, पण मला वाटते की पुढील 24 तासांत मी ते मोठ्या प्रमाणात वाढवणार आहे.”
यापूर्वी मंगळवारी रशियाने ट्रम्प यांच्या या धमकीचा निषेध केला. रशियन व्यापार भागीदारांविरोधात अशी विधाने करणे म्हणजे थेट मॉस्कोलाधमकावणे असल्याचा रशियाने आरोप केला आहे.
ट्रम्प यांच्या टॅरिफ धमकीनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) देखील तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या अधिकृत निवेदनात भारताने अमेरिकेच्या धमक्यांना ‘अन्यायकारक आणि अवाजवी’म्हटले आहे. भारताने अमेरिकेवर टीका करताना युरोपियन युनियनसह अमेरिका स्वतः रशियासोबत मोठ्या प्रमाणावर व्यापार करत असल्याचा मुद्दाही पुन्हा एकदा ठामपणे मांडला.
परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, “भारतीय ग्राहकांसाठी परवडणारे आणि स्थिर ऊर्जा खर्च सुनिश्चित करण्यासाठी भारताची आयात आवश्यक आहे. जागतिक बाजारपेठेतील परिस्थितीमुळे ही गरज भागवणे भाग आहे.”
ट्रम्प यांनी 1 ऑगस्टच्या अंतिम मुदतीपूर्वीच भारतावर 25 टक्के शुल्क लागू केले होते. अमेरिकेच्या मते, हे शुल्क भारतातील अमेरिकन वस्तूंवरील जास्त दरामुळे आणि रशियासोबतचे संबंध तसेच ‘ब्रिक्स’ गटामधील सहभागामुळे दंड म्हणून लागू करण्यात आले आहे.