कंटेनरमध्ये लपवले ड्रोन, अन्… युक्रेनने रशियावर सर्वात मोठा हल्ला कसा केला? जाणून घ्या

Russia Ukraine War

Russia Ukraine War | युक्रेनने (Ukraine) रशियावर (Russia) आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला (drone attack) करून संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. या हल्ल्यात युक्रेनच्या एफपीव्ही ड्रोनने रशियाच्या 40 पेक्षा जास्त बॉम्बर्स विमानांवर अचूक हल्ला करत अब्जावधी डॉलर्सचे नुकसान घडवून आणले. इतक्या आत घुसून हल्ला होईल, असा विचारही रशियाने कधी केला नव्हता. रशियाची जागतिक दर्जाची सुरक्षा प्रणालीदेखील या हल्ल्याला रोखू शकली नाही. जाणकारांच्या मते, गेल्या 3 वर्षांतील या युद्धातील हे युक्रेनचे सर्वात मोठे आणि प्रभावी यश ठरले आहे.

दीड वर्षांची तयारी

हे ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी युक्रेनने दीड वर्षांपूर्वीच तयारी सुरू केली होती. राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की (Zelenskyy) स्वतः या मोहिमेवर सतत नजर ठेवून होते. सुरुवातीला हे ड्रोन कंटेनरमध्ये लपवून ठेवण्यात आले. नंतर ते एका ट्रकच्या सहाय्याने रशियन सीमेत पोहोचवण्यात आले. त्याच ट्रकमधून एकामागोमाग एक एफपीव्ही ड्रोनने उड्डाण घेतले आणि रशियातील प्रमुख एअरबेस लक्ष्य केले.

रशियामध्ये या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चौकशी सुरू झाली असून ज्या ट्रकने ड्रोन पोहोचवले, त्याचा चालकाची चौकशी केली जात आहे. मात्र त्याला संपूर्ण माहिती नसल्याचे सांगितले जात आहे. त्याला केवळ “कोणीतरी भेटायला येणार” असल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र युक्रेनी ड्रोननी रशियाच्या सुरक्षेचे कवचच भेदले.

कमी खर्च, मोठं नुकसान

या हल्ल्यात बेलाया, ओलेन्या, डियाघिलेव आणि इव्हानोवो हे रशियाचे महत्त्वाचे एअरबेस निशाण्यावर आले. युक्रेनने केवळ काहीशे डॉलर्सच्या किमतीच्या एफपीव्ही ड्रोन वापरून हा हल्ला केला, तर रशियाचे जे बॉम्बर्स उद्ध्वस्त झाले, त्यांची किंमत अब्जावधी डॉलर्समध्ये होती. या पार्श्वभूमीवर युक्रेनचा हा हल्ला अत्यंत कमी खर्चात मिळवलेला मोठा विजय ठरतो.

एफपीव्ही ड्रोन ठरले गेमचेंजर

एफपीव्ही ड्रोन रिमोट कंट्रोलने चालवले जातात आणि त्यातून मोठ्या स्क्रीनवर थेट दृश्ये पाहता येतात. यामुळे ड्रोन ऑपरेटर लक्ष्यावर अचूक निशाणा साधतो. युक्रेनने या तंत्रज्ञानाचा अत्यंत कुशल वापर करत रशियाला चकित केलं आहे. प्रत्युत्तरात, रशियाने 24 तासांत 472 ड्रोन आणि 7 क्षेपणास्त्रे युक्रेनवर डागली असून, यात 12 युक्रेनी सैनिक मारले गेले आहेत.