UPI 20 दिवसात तिसऱ्यांदा ठप्प, वारंवार सेवा वापरण्यात अडथळे का येत आहेत?

UPI

UPI Down | देशभरातील लाखो नागरिकांना युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सेवा वापरताना काल (12 एप्रिल) तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. डिजिटल पेमेंट करताना अनेकांना व्यवहार अपयशी ठरत असल्याचा अनुभव आला असून, खरेदी, बिल पेमेंट आणि फंड ट्रान्सफर यांसारखे व्यवहार ठप्प झाले.

गेल्या 20 दिवसांमध्ये यूपीआय (UPI Down) वापरताना तिसऱ्यांदा समस्या आली आहे. यूपीआय वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अशाप्रकारची समस्या आल्याने लाखो नागरिकांना याचा फटका बसतो.

या व्यत्ययामुळे एसबीआय (SBI), आयसीआयसीआय (ICICI), एचडीएफसी (HDFC) यांसारख्या आघाडीच्या बँकांचे अ‍ॅप्सही प्रभावित झाले. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने यासंदर्भात अधिकृत स्पष्टीकरण दिले असून, सेवा तात्पुरत्या स्वरूपात खंडित झाल्या होत्या.

2,358 तक्रारी, 81% व्यवहार फेल

ऑनलाइन आउटेज ट्रॅक करणाऱ्या डाउन डिटेक्टर (DownDetector) च्या माहितीनुसार, दुपारी 1 वाजेपर्यंत UPI संदर्भातील 2,358 तक्रारी नोंदवण्यात आल्या. यामध्ये 81% तक्रारी पेमेंट फेल्युअर संदर्भातील होत्या, तर 17% तक्रारी फंड ट्रान्सफर अडचणीशी संबंधित होत्या.

वारंवार यूपीआय ठप्प (Digital Payment Issue) होण्याचे कारण काय ?

NPCI ने ट्विटरवर पोस्ट करत म्हटले की, “आम्हाला तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे काही यूपीआय व्यवहार अयशस्वी होत आहेत. ही समस्या दूर करण्याचे प्रयत्न सुरू असून, वापरकर्त्यांना वेळोवेळी माहिती दिली जाईल. झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.”

20 दिवसांत तिसऱ्यांदा UPI ठप्प

गेल्या काही आठवड्यांपासून UPI सेवा वारंवार अडथळ्यांना सामोरे जात आहे. शनिवारी झालेला हा व्यत्यय गेल्या 20 दिवसांत तिसऱ्यांदा अनुभवाला आला आहे. यापूर्वी 26 मार्च आणि 2 एप्रिल रोजीदेखील अशीच तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. तांत्रिक अडचणीमुळे वारंवार यूपीआय सेवा वापरताना समस्या येत आहे.

मार्चमध्ये 18.3 अब्ज व्यवहार

मार्च 2025 मध्ये UPI द्वारे तब्बल 18.3 अब्ज व्यवहार झाले होते. यांची एकूण आर्थिक उलाढाल 24.77 लाख कोटी रुपये होती. फेब्रुवारीच्या तुलनेत यामध्ये 13% वाढ झाली आहे. सध्या दररोज सरासरी 590 मिलियन व्यवहार UPI च्या माध्यमातून होतात, ज्यांचे मूल्य सुमारे 79,910 कोटी रुपये आहे.