Gold Card Visa : तुम्ही जर अमेरिकेत स्थायिक होण्याचे स्वप्न पाहत असाल तर आता तुम्हाला नोकरी किंवा कुटुंबाच्या आधाराची वाट बघावी लागणार नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशी नागरिकांसाठी एक नवीन आणि विशिष्ट ‘गोल्ड कार्ड’ व्हिसा योजना जाहीर केली आहे. जी थेट मोठी आर्थिक देणगी देऊन स्थायी निवास मिळवून देते.
अमेरिकेच्या ट्रेझरीमध्ये (Treasury) 1 दशलक्ष अमेरिकन डॉलर जमा केल्यास आता तुम्ही अमेरिकेचे स्थायी निवासी बनू शकता. या कार्डसाठीचे ऑनलाईन अर्ज सध्या सुरू झाले आहेत.
काय आहे ‘गोल्ड कार्ड’ व्हिसा?
गोल्ड कार्ड व्हिसा हा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेला व्हिसा-आधारित स्थलांतरण कार्यक्रम आहे. हा व्हिसा गुंतवणूक किंवा आर्थिक योगदान देऊन अमेरिकेत कायदेशीर स्थायी निवास (कायमस्वरूपी ग्रीन कार्डप्रमाणे) मिळवून देतो, जो पारंपारिक रोजगार किंवा कुटुंब-आधारित व्हिसा मार्गांपेक्षा वेगळा आहे.
एकदा अर्ज मंजूर झाल्यावर, या कार्ड धारकांना अमेरिकेचे नागरिकत्व (US Citizenship) मिळण्याचा मार्ग उघडतो. जो स्थायी रहिवाशांसाठी असलेल्या सामान्य नैसर्गिकरण प्रक्रियेच्या अधीन असतो.
खर्च आणि कार्यपद्धती
1. वैयक्तिक अर्जदारांसाठी (Individual Applicants):
गोल्ड कार्ड मिळवण्यासाठी 1,000,000 अमेरिकन डॉलर इतकी शुल्क भरावी लागेल (प्रक्रिया शुल्काव्यतिरिक्त). अर्जदारांना डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीकडे (DHS) 15,000 डॉलर इतके परत न मिळणारे प्रक्रिया शुल्क जमा करावे लागते, त्यानंतर अर्जांवर जलद गती (Expedited Basis) ने कार्यवाही केली जाते. पडताळणी पूर्ण झाल्यावर, अर्जदारांना अमेरिकेच्या सरकारला 1 दशलक्ष डॉलरची ‘देणगी’ द्यावी लागते, जी अर्जदाराकडून अमेरिकेला ‘मोठा फायदा’ मिळेल याचा पुरावा मानली जाते.
2. कंपन्यांकडून प्रायोजकत्व (Sponsorship):
परदेशी कर्मचाऱ्यांसाठी प्रायोजकत्व करणाऱ्या कंपन्यांसाठी, ‘ट्रम्प कॉर्पोरेट गोल्ड कार्ड’ (Trump Corporate Gold Card) अंतर्गत प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी 2,000,000 अमेरिकन डॉलर शुल्क भरावे लागते. तसेच, प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी 15,000 डॉलर प्रक्रिया शुल्क अनिवार्य आहे. कंपनी मूळ 2 दशलक्ष डॉलरचे योगदान वार्षिक 1 टक्के देखभाल शुल्क आणि 5 टक्के हस्तांतरण शुल्क भरून नवीन कर्मचाऱ्याकडे हस्तांतरित करू शकते.
हा निधी थेट अमेरिकेच्या ट्रेझरीमध्ये जमा होतो आणि वाणिज्य आणि सार्वजनिक वित्ताला मदत करतो.
ग्रीन कार्ड आणि गोल्ड कार्ड मधील मुख्य फरक
| तुलनेचा आधार | ग्रीन कार्ड | गोल्ड कार्ड |
| पात्रता आणि मार्ग | कुटुंब, रोजगार, लॉटरी, किंवा व्यवसाय गुंतवणूक आणि अमेरिकेत रोजगार निर्मिती आवश्यक. | मोठ्या आर्थिक योगदानावर पूर्णपणे आधारित. रोजगार निर्मिती किंवा प्रायोजकत्व आवश्यक नाही. |
| खर्च | सरकारला मोठी रक्कम थेट द्यावी लागत नाही. गुंतवणूक वास्तविक व्यवसायात करावी लागते. | एककालीन मोठी देणगी (1 ते 2 दशलक्ष डॉलर) थेट ट्रेझरीमध्ये जमा करावी लागते. हा खूप महागडा मार्ग आहे. |
| प्रक्रिया आणि गती | लांब प्रक्रिया, अनेक कागदपत्रे, वार्षिक कोटा आणि प्रतिक्षा यामुळे वर्षांनुवर्षे थांबावे लागते. | जलद मार्ग (Fast-track) म्हणून जाहिरात. आर्थिक योगदानावर अवलंबून असल्याने प्रक्रिया सोपी आणि वेगवान. |
| कोणासाठी | कुटुंबे, कुशल व्यावसायिक, विद्यार्थी, निर्वासित आणि दीर्घकालीन व्यावसायिक योजना असलेले गुंतवणूकदार. | अत्यंत श्रीमंत व्यक्ती आणि टॉप ग्लोबल प्रतिभा (Top Global Talent) टिकवून ठेवू इच्छिणाऱ्या कंपन्यांसाठी. सामान्य स्थलांतरितांसाठी नाही. |
वैयक्तिक आणि कॉर्पोरेट गोल्ड कार्ड व्हिसासाठी अर्ज आता अमेरिकेच्या सरकारी पोर्टलवर (Government Portal) उपलब्ध आहेत.









