उत्तराखंडमध्ये भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळळी; 1 जणाचा मृत्यू

Uttarakhand Bus Accident

Uttarakhand Bus Accident | उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील घोलतीर येथे भीषण अपघात (Uttarakhand Bus Accident) झाला आहे. प्रवाशांनी भरलेली टेम्पो ट्रॅव्हलर बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावरून (Badrinath National Highway) खोल दरीत कोसळून थेट अलकनंदा नदीत (Alaknanda River) वाहून गेली.

या अपघातात आतापर्यंत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 7 जण जखमी झाले आहेत. मात्र, 20 हून अधिक प्रवासी बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अपघाताचे कारण आणि प्राथमिक माहिती

प्राथमिक माहितीनुसार, टेम्पो ट्रॅव्हलरचा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, ज्यामुळे हा भयंकर अपघात घडला. वाहन खोल दरीत कोसळून अलकनंदा नदीच्या पाण्यात गेले. पावसाळ्यामुळे नदीतील पाण्याचा प्रवाह वाढलेला असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत.

युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

अपघाताची माहिती मिळताच, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), स्थानिक पोलीस आणि प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य (rescue operation) युद्धपातळीवर सुरू आहे. अधिकाऱ्यांनी माहिती दिली की , “एक व्यक्तीचा मृत्यू झाला असून, 7 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.”

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत लिहिले, “रुद्रप्रयाग जिल्ह्यात टेम्पो ट्रॅव्हलर नदीत कोसळल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. एसडीआरएफ आणि इतर बचाव पथकांद्वारे युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मी स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी मी देवाकडे प्रार्थना करतो.”

सध्या पावसाळ्यामुळे अलकनंदा नदीतील पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे, ज्यामुळे बेपत्ता प्रवाशांचा शोध घेणे कठीण झाले आहे. तरीही, एसडीआरएफ, पोलीस आणि स्थानिक प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. स्थानिक लोकांनाही बचावकार्यात सहभागी करून घेण्यात आले आहे.