रेल्वेत भाजप आमदाराला विंडो सीट दिली नाही, समर्थकांकडून प्रवाशाला मारहाण; पक्षाने बजावली नोटीस

Passenger in Vande Bharat assaulted

Passenger in Vande Bharat assaulted | रेल्वेत भाजप आमदाराला बसण्यासाठी विंडो सीट दिली नाही म्हणून एका प्रवाशाला कथितरित्या मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दिल्ली ते भोपाळ वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशाला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

या घटनेत उत्तर प्रदेशातील बबीना मतदारसंघाचे भाजप आमदार राजीव सिंह परिच्छा यांच्या समर्थकांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने आमदाराला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे

रेल्वेतील मारहाणीची घटना

19 जून 2025 रोजी दिल्लीहून भोपाळला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडली. व्हायरल व्हिडिओमध्ये आमदार परिच्छा बाजूला उभे असताना, त्यांचे समर्थक एका प्रवाशाला मारहाण करताना दिसत आहेत. मारहाणीत प्रवासी जखमी झाला असून, त्याच्या नाकातोंडातून रक्त येत असल्याचे व्हिडिओत दिसते. या घटनेने सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

माजी मध्य प्रदेश काँग्रेस आमदार मुकेश नायक यांनी हा व्हिडिओ शेअर करत आमदारांवर गुंडगिरीकेल्याचा आरोप केला. त्यांच्या मते, आमदाराच्या समर्थकांनी प्रवाशाला मारहाण केली.

आमदार परिच्छा यांचा दावा

आमदार परिच्छा यांनी सरकारी रेल्वे पोलिसांकडे (GRP) त्या प्रवाशाविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रवासी वारंवार पाय पसरून त्यांच्या वैयक्तिक जागेत अडथळा निर्माण करत होता. त्यांनी आक्षेप घेतल्यानंतर प्रवाशाने गैरवर्तन केले आणि झाशी स्थानकावर आपल्या साथीदारांना बोलावून परिच्छा यांच्या समर्थकांना मारहाण केली. मात्र, व्हायरल व्हिडिओत वेगळेच चित्र दिसते.

रिपोर्टनुसार, भाजप आमदाराने प्रवाशाला सीट बदलण्यास सांगितले होते, परंतु त्याने नकार दिल्याने वाद झाला. आमदारांचे कुटुंबीय दूरच्या सीटवर बसले होते आणि त्यांना एकत्र बसायचे होते, असेही सांगितले जाते.

भाजपची कारवाई

या घटनेनंतर भाजपचे प्रदेश सरचिटणीस गोविंद नारायण शुक्ला यांनी आमदार परिच्छा यांना ‘कारण दाखवा’ नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये सात दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आले असून, अन्यथा कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. नोटीसमध्ये म्हटले आहे, “तुमच्या कृतींमुळे पक्षाची प्रतिमा डागाळली आहे आणि हे गंभीर गैरशिस्तीचे लक्षण आहे.”