नवी दिल्ली- भारताच्या उपराष्ट्रपतीपदासाठी उद्या मतदान होणार असून लगेच संध्याकाळी मतमोजणीनंतर निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) आणि विरोधी ‘इंडिया’ आघाडीकडून माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी (B. Sudarshan Reddy) यांच्यात थेट लढत होत आहे. दरम्यान, माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी गेल्या महिन्यात पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तडकाफडकी राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपतीपदासाठी ही निवडणूक होत आहे.
सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत संसद भवनात मतदान प्रक्रिया पार पडेल. दोन्ही सभागृहांमधील विद्यमान खासदार मतदान करतील. संध्याकाळी 6 वाजता मतमोजणी सुरू होईल व त्यानंतर लगेच निकाल जाहीर केला जाईल. यासोबतच देशाला 50 दिवसानंतर नवा उपराष्ट्रपती मिळेल. धनखड यांनी 21 जुलैला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता.भाजपाचे तामिळनाडूतील ज्येष्ठ नेते राहिलेल्या सी. पी. राधाकृष्णन यांच्यामागे एनडीएचा एकमुखी पाठिंबा आहे. बी. सुदर्शन रेड्डी हे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती असून त्यांनी ‘संविधान व लोकशाही वाचवण्याचे’ आवाहन करत सत्ताधाऱ्यांनाही पाठिंबा देण्याचे आवाहन करत आहेत. मतदार असलेल्या खासदारांना पक्षांच्या व्हीपची मर्यादा ओलांडून स्वतंत्रपण मतदान करण्याचे आवाहन केले. तेलंगणाचे रहिवासी असलेल्या रेड्डी यांना हैदराबादचे खासदार आणि एआयएमआयएमचे प्रमुख असद्दुदीन ओवैसी यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
संसदेत सत्ताधारी एनडीएकडे 439 खासदारांचे पाठबळ आहे, तर विरोधी आघाडीकडे 324 खासदार आहेत. सध्या दोन्ही सभागृहांतील सात जागा रिक्त असल्याने एकूण 781 खासदारांना मताधिकार आहे. यामध्ये राज्यसभेतील 239 आणि लोकसभेतील 542 खासदारांचा समावेश आहे. बहुमतासाठी 391 मते हवीत. एनडीएकडे संख्याबळ असल्यामुळे राधाकृष्णन यांचे पारडे जड आहे. मात्र, या निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान असल्याने इंडिया आघाडी मतांच्या फाटाफुटीवर अवलंबून आहे. गेल्या दोन दशकांपासून उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी उमेदवाराचे मताधिक्य वाढतच आहे. मात्र, अचानक लागलेल्या या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. आज दोन्ही आघाडीतर्फे आपापल्या खासदारांची कार्यशाळा घेत मतदान प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
