‘मुस्लिम आणि काश्मिरींना लक्ष्य करू नका’, पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचे शांततेचे आवाहन

himanshi narwal

Pahalgam Terror Attack | जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी नरवाल यांनी शांततेची मागणी केली आहे.

“मुस्लिम आणि काश्मिरी लोकांना त्रास देऊ नका. आम्हाला शांतता हवी आहे, केवळ शांतता. आम्हाला न्याय हवा आहे. ज्या लोकांनी माझ्या पतीवर अन्याय केला, त्यांना शिक्षा झाली पाहिजे,” असे भावनिक हिमांशी नरवाल यांनी देले. काल (1 मे) लेफ्टनंट नरवाल यांचा 27 वा वाढदिवस होता. या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

हिमांशी आणि लेफ्टनंट नरवाल यांचा विवाह 22 एप्रिलच्या दहशतवादी हल्ल्याच्या बरोबर एक आठवडा आधी झाला होता. या हल्ल्यात बहुतेक पर्यटक असलेले 26 लोक मारले गेले. त्या पहलगाममध्ये हनीमूनसाठी गेले असताना दहशतवाद्यांनी लेफ्टनंट नरवाल यांच्यावर गोळ्या झाडल्या.

हिमांशी म्हणाल्या की, ‘मुस्लिम आणि काश्मिरींना त्रास देण्याची गरज नाही. पण या हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. सर्वांनी विनय नरवालसाठी प्रार्थना करावी. तो जिथे असेल तिथे आनंदी राहो. आपण शोक व्यक्त करण्यासाठी नाही तर त्यांच्या देशभक्तीचा सन्मान करण्यासाठी येथे आलो आहोत.’

नरवाल यांची बहीण सृष्टी हिने रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या लोकांचे आभार मानले. “येथे येऊन रक्तदान करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानते. आम्हाला संदेशही येत आहेत. लोकांनी रक्तदान शिबिराला उत्साहाने प्रतिसाद दिला आहे. सरकारनेही खूप मदत केली आहे,” असे सृष्टी म्हणाली.

हे शिबिर कर्नालस्थित ‘नॅशनल इंटिग्रेटेड फोरम ऑफ आर्टिस्ट्स अँड ॲक्टिव्हिस्ट्स’ (NIFAA) या स्वयंसेवी संस्थेने आयोजित केले होते.

दरम्यान, यापूर्वी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी नरवाल यांच्या कुटुंबाला50 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचे जाहीर केले आहे.