WAVES 2025 Summit in Mumbai | मुंबईच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये काल (1 मे) ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट’ (WAVES 2025 Summit) या भव्य परिषदेला दिमाखदार सुरुवात झाली. या आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिखर परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते झाले. त्यांनी भारताला सर्जनशील अर्थव्यवस्थेचा (Creative Economy) जागतिक केंद्रबिंदू बनवण्याचे आवाहन केले.
त्यांनी या क्षणाला भारताच्या सर्जनशील क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक क्षण असल्याचे संबोधले आणि जागतिक स्तरावरील निर्मात्यांना “भारताला तुमचं कंटेंट प्लेग्राउंड बनवा” असं आवाहन केलं. पंतप्रधानांनी भारताची सांस्कृतिक विविधता, कथाकथनाची समृद्ध परंपरा आणि उदयोन्मुख ‘ऑरेंज इकॉनॉमी’ (सर्जनशील अर्थव्यवस्था) यावर विस्तृतपणे भाष्य केले. भारतात तयार होणारे कंटेंट आणि देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्याची क्षमता असलेल्या कंटेंट क्रिएटर्सबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. लवकरच ‘वेव्ह्स’ पुरस्कारांसारख्या आणखी नवीन उपक्रमांची घोषणा करणार असल्याचे आश्वासनही पंतप्रधान मोदींनी दिले.
या शिखर परिषदेत 100 पेक्षा अधिक कलाकार, गुंतवणूकदार, धोरणकर्ते, टेक इनोव्हेटर्स आणि मीडिया लीडर्ससहभागी झाले आहेत. यामध्ये 90 हून अधिक देशांमधील 10,000 हून अधिक प्रतिनिधी सहभागी असून, 1000 निर्माता, 300 कंपन्या आणि 350 स्टार्टअप्स यांनी आपली उपस्थिती नोंदवली आहे.
पंतप्रधान मोदींनी भारतातील कथाकथनाची परंपरा आणि सांस्कृतिक विविधतेचे महत्त्व अधोरेखित करत जागतिक निर्मात्यांना भारतात गुंतवणुकीचे आमंत्रण दिले. त्यांनी ‘वेव्ह्स’ पुरस्कार सुरू करण्याची घोषणाही केली, जे जगातील सर्वात मोठे सर्जनशील सन्मान असतील.
बॉलिवूड स्टार शाहरुख खान यांनी क्रिएटर इकॉनॉमीवर आपले विचार मांडले. YouTube CEO नील मोहन यांनी भारताच्या जागतिक कंटेंट क्षेत्रातील भूमिकेवर भर दिला, तर मुकेश अंबानी यांनी OTT प्लॅटफॉर्म्स आणि 100 अब्ज डॉलर्सच्या मीडिया उद्योगाचे भविष्य उलगडले.
‘WAVES 2025’ मध्ये सहभागी झालेले प्रमुख नामवंत:
या चार दिवसीय कार्यक्रमात रजनीकांत, चिरंजीवी, मोहनलाल, हेमा मालिनी, शाहरुख खान, आमिर खान, अक्षय कुमार, ऐश्वर्या राय बच्चन, करीना कपूर खान, एकता कपूर, एस.एस. राजामौली, ए.आर. रहमान, अनिल कपूर, आलिया भट्ट, विकी कौशल, अल्लू अर्जुन, शाहिद कपूर, रितेश देशमुख, विजय देवरकोंडा यांचा सहभाग आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातून Netflix Co-CEO टेड सारंडोस, YouTube चे नील मोहन आणि Instagram चे प्रमुख अॅडम मोसेरी हे देखील सहभागी झाले आहेत.
‘WAVES 2025’ शिखर परिषदेतील तिकीटचे दर
- बिझनेस व्हिजिटर पास (Business Visitor Pass): ₹3000 — 1 ते 4 मे दरम्यान सत्रे व प्रदर्शनांसाठी पूर्ण प्रवेश.
- पब्लिक व्हिजिटर पास (Public Visitor Pass): ₹99 — 3 व 4 मे रोजी सार्वजनिक क्षेत्रात प्रवेश.
- स्टुडंट पास (Student Pass): विद्यार्थ्यांना 3 व 4 मे रोजी मर्यादित प्रवेश.
- मीडिया पास (Media Pass): मान्यताप्राप्त पत्रकारांसाठीच.
- एक्झिबिटर पास (Exhibitor Pass): प्रत्येक 3 चौ.मी. स्टॉलसाठी 1 पास, ₹30,000 फीमध्ये समाविष्ट.
‘वेव्ह्स 2025’ भारताला सर्जनशीलता, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक नेतृत्व यामध्ये जागतिक पातळीवर पुढे नेत आहे.