Priya Nair | हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने (एचयूएल) एक ऐतिहासिक निर्णय घेतला असून, प्रिया नायर (Priya Nair) यांची कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) म्हणून नियुक्ती जाहीर केली.
1 ऑगस्ट 2025 पासून पदभार स्वीकारणाऱ्या प्रिया नायर या एचयूएलच्या (HUL) 92 वर्षांच्या इतिहासातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. हा निर्णय भारतातील कॉर्पोरेट जगतात लिंग समानतेच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
प्रिया नायर सध्या युनिलिव्हरमध्ये ब्युटी अँड वेलबिंग विभागाच्या अध्यक्षा आहेत, जो कंपनीचा वेगाने वाढणारा व्यवसाय आहे. त्या रोहित जावा यांची जागा घेतील, जे 31 जुलै 2025 रोजी निवृत्त होत आहेत.
आवश्यक मंजुरीनंतर नायर एचयूएलच्या संचालक मंडळात सामील होतील आणि युनिलिव्हर लीडरशिप एक्झिक्युटिव्हचे सदस्य म्हणूनही काम करत राहतील.
प्रियाचे 30 वर्षांचे योगदान
1995 मध्ये एचयूएलमध्ये प्रवेश केलेल्या प्रिया यांनी तीन दशकांहून अधिक काळ विविध महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. त्यांनी डव्ह, रिन आणि कम्फर्ट या ब्रँड्ससाठी ब्रँड व्यवस्थापक म्हणून सुरुवात केली.
लाँड्री, ओरल केअर, डिओडोरंट्स आणि ग्राहक विकासात त्यांनी नेतृत्व केले. दक्षिण आशियासाठी ब्युटी अँड पर्सनल केअरच्या कार्यकारी संचालकपदावरून 2022 मध्ये ग्लोबल चीफ मार्केटिंग ऑफिसर आणि 2023 मध्ये अध्यक्षा म्हणून त्यांची बढती झाली.
प्रिया यांनी सिडनहॅम कॉलेजमधून कॉमर्स आणि सिम्बायोसिसमधून मार्केटिंगमध्ये एमबीए केले आहे. त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधूनही प्रशिक्षण घेतले. एचयूएलचे चेअरमन नितिन परांजपे यांनी त्यांच्या सखोल ज्ञान आणि उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करत, प्रिया यांच्यावर विश्वास व्यक्त केला. “प्रिया एचयूएलला नव्या उंचीवर नेईल,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान रोहित जावा यांनी 2023 पासून सीईओ म्हणून काम पाहिले. त्यांच्या काळात कंपनीने आव्हानात्मक बाजारपेठेत वाढ साधली, परंतु आता वैयक्तिक आणि व्यावसायिक कारणांसाठी ते निवृत्त होत आहेत.