Volodymyr Zelensky on India: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर अमेरिका कर (tariffs) लावण्याच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी, चीन आणि रशियाच्या प्रमुखांसोबत एकत्र दिसले होते. त्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर झेलेन्स्की यांनी हे विधान केले. ‘माझ्या मते, रशियासोबत व्यवहार सुरू ठेवणाऱ्या देशांवर कर लावण्याची कल्पना योग्य आहे,’ असे मत त्यांनी व्यक्त केले. याबाबत हिंदुस्तान टाईम्सने वृत्त दिले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रशासन रशियाविरुद्धचे निर्बंध वाढवण्याच्या तयारीत आहे. गेल्या महिन्यात अलास्कामध्ये झालेल्या ट्रम्प-पुतिन शिखर परिषदेत कोणताही तोडगा न निघाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, राष्ट्रीय आर्थिक परिषदेचे संचालक केविन हॅसेट यांनीही मॉस्कोविरुद्ध नवीन निर्बंधांचे संकेत दिले आहेत. त्यांनी भारताचे उदाहरण देत म्हटले की, ‘राष्ट्रीय आर्थिक परिषदेमध्ये, आम्ही हे सुनिश्चित करण्यासाठी जबाबदार आहोत की निर्बंधांची अंमलबजावणी होत आहे आणि जे लोक युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाला मदत करत आहेत, उदाहरणार्थ, भारत ज्या प्रकारे रशियन तेल खरेदी करत आहे.आम्ही त्यांना आर्थिकदृष्ट्या उत्तर देण्यास तयार आहोत.’
शांततेसाठी भारताचे प्रयत्न सुरूच
दरम्यान, भारत मात्र रशिया-युक्रेन युद्धवर लवकर आणि शांततेने तोडगा काढण्यासाठी आपले राजनैतिक प्रयत्न वाढवत आहे. गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी दोनदा संवाद साधला होता, तर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी युक्रेनचे परराष्ट्र मंत्री अँड्री सिबीहा यांच्याशी चर्चा केली होती.
गेल्या आठवड्यात मोदींनी युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशीही युक्रेनमधील परिस्थितीवर चर्चा केली होती.
दरम्यान, भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावले आहे. अशाप्रकारे, अमेरिकेने भारतावर एकूण 50 टक्के टॅरिफ लावले आहे. व्यापार करारामुळे देखील दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा – समुद्रातील केबल तुटली; भारतासह अनेक देशातील इंटरनेट सेवेवर परिणाम