बोकारो स्टील प्लांट: नोकरीसाठीचे आंदोलन पेटलं, एकाचा मृत्यू; कलम 144 लागू

Bokaro Steel Plant | झारखंडमधील बोकारो स्टील प्लांटच्या (Bokaro Steel Plant) मुख्यालयाजवळ गुरुवारी विस्थापित तरुणांना नोकऱ्या देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) कथित लाठीचार्जमुळे 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्रेम महतो असे मृताचे नाव असून, किमान 15 जण जखमी झाले आहेत. त्यातील एक जण ICU मध्ये असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

विस्थापित अप्रेंटिस संघाच्या (VAS) नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी प्लांटच्या मुख्य प्रवेशद्वारावरील बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी CISF जवानांनी हस्तक्षेप करत लाठीचार्ज केला. याच झटापटीत प्रेम महतोच्या डोक्याला लाठी लागून तो कोसळला. तातडीने रुग्णालयात नेल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

घटनेनंतर संतप्त आंदोलकांमुळे संपूर्ण बोकारो शहर बंद ठेवण्यात आले आहे. बोकारोच्या उपायुक्त विजया जाधव (Vijaya Jadhav) यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 3 सदस्यीय समिती नेमण्यात आली असून, BSL च्या मुख्य महाव्यवस्थापकाला अटक करण्याचे आदेशही दिले आहेत. मृताच्या कुटुंबीयांना 20 लाख रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे.

1967-68 मध्ये प्लांट उभारणीसाठी 34,000 एकर जमीन अधिग्रहित करण्यात आली होती. त्यावेळी 20,000 नोकऱ्यांचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र वर्षानुवर्षे प्रतिक्षा करूनही नोकऱ्या मिळाल्या नाहीत.

2016 मध्ये सरकारने 4,328 विस्थापित तरुणांना नोकरी देण्याचं ठरवलं होतं, आणि 45 वर्षांवरील लोकांना दुकाने चालवण्यास सुविधा देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र 2016 ते 2022 दरम्यान फक्त 1,500 तरुणांनाच टप्प्याटप्प्याने अप्रेंटिसशिप मिळाली असल्याचा आरोप केला जात आहे.

कलम 144 लागू

फेब्रुवारी 2025 मध्ये अधिकृत बैठक झाल्यानंतरही काहीच प्रगती न झाल्याने, 3 एप्रिलपासून विस्थापित तरुण आणि त्यांचे कुटुंबीय प्लांटसमोर धरणे आंदोलन करत होते. लाठीमारानंतर आंदोलनाने उग्र रूप धारण केले. त्यामुळे झारखंडमधील अनेक संघटनांनी बंदची हाक दिली आहे. चास अनुमंडल परिसरात कलम 144 लागू करण्यात आले असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.