वानिया अग्रवाल कोण आहेत? मायक्रोसॉफ्टच्या कार्यक्रमात थेट बिल गेट्स यांच्यावर केला ‘नरसंहार’चा आरोप 

Vaniya Agrawal Slams Microsoft | नुकताच रेडमंड (Redmond) येथील मायक्रोसॉफ्ट (Microsoft) मुख्यालयातकंपनीच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पॅलेस्टाईन (Palestine) समर्थक कर्मचाऱ्यांनी मंचावर उघडपणे निषेध नोंदवल्याने कार्यक्रमाला अनपेक्षित वळण मिळाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय वंशाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर वानिया अग्रवाल यांनी देखील यावेळी कार्यक्रमात उघडपणे इस्त्रायल-पॅलेस्टाइन युद्धावर भाष्य केले.

या कार्यक्रमाला मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स (Bill Gates), माजी CEO स्टीव्ह बाल्मर (Steve Ballmer) आणि विद्यमान CEO सत्या नडेला (Satya Nadella) हे मंचावर उपस्थित होते. कंपनीचे AI प्रमुख मुस्तफा सुलेमान (Mustafa Suleyman) यांचे मुख्य भाषण सुरू असतानाच, दोन महिला कर्मचाऱ्यांनी इस्रायलसोबतच्या तंत्रज्ञान करारांवर आक्षेप घेतला.

कंपनीतील कर्मचारी इब्तिहाल अबौसाद यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. मंचाकडे जात त्यांनी ओरडत सुलेमान यांच्यावर टीका केली, “तुम्ही AI चा चांगल्या कामांसाठी वापर असल्याचे सांगता, पण मायक्रोसॉफ्ट इस्रायली सैन्याला AI शस्त्र पुरवते. 50 हजार लोक मारले गेले आहेत. ही कंपनी नरसंहाराला हातभार लावत आहे.”

यानंतर वानिया अग्रवाल (Vania Agarwal) या भारतीय-अमेरिकन सॉफ्टवेअर इंजिनीअरने अधिक तीव्र निषेध व्यक्त केला. “तुमचं सगळ्यांचं साजरं करणं म्हणजे ढोंग आहे. गाझा पट्टीत मायक्रोसॉफ्टच्या तंत्रज्ञानाचा वापर करून हजारो लोक मारले गेलेत. या रक्तात न्हालेल्या प्रकल्पांना तुम्ही पाठिंबा देता?”

यावेळी सुरक्षारक्षकांनी दोघींनाही कार्यक्रमातून बाहेर नेले. नंतर वानिया अग्रवाल यांनी कंपनीतील सहकाऱ्यांना एक सामूहिक ईमेल पाठवून आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. त्या 11 एप्रिलपासून मायक्रोसॉफ्टमध्ये काम करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “आज मी मंचावर उभं राहून जे केले, तेच योग्य होतं. मी अशा कंपनीचा भाग राहू शकत नाही जी इस्रायलच्या हिंसक कारवायांना पाठिंबा देते,” असं त्यांनी आपल्या मेलमध्ये म्हटलं.

वानिया अग्रवाल कोण आहेत?

व्हानिया अग्रवाल या ॲरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीच्या माजी विद्यार्थिनी असून त्यांनी 2019 मध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअरिंगमधील पदवी पूर्ण केली. त्यांनी ॲमेझॉनमध्ये इंटर्नशिपनंतर 2019 ते 2022 पर्यंत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम केलं. सप्टेंबर 2023 मध्ये त्या मायक्रोसॉफ्टमध्ये सामील झाल्या. पण आता, फक्त एका वर्षात त्यांनी नैतिक कारणांमुळे कंपनीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.

Share:

More Posts