New rules from August 1: आजपासून (1 ऑगस्ट) तुमच्या दैनंदिन व्यवहार, प्रवास आणि कार्डच्या फायद्यांवर परिणाम करणारे महत्त्वाचे आर्थिक बदल (New rules from August 1) लागू होणार आहेत. युपीआय व्यवहारांसाठी नवीन नियम, खासगी वाहनांसाठी फास्टॅग वार्षिक पास आणि निवडक एसबीआय क्रेडिट कार्डवरील विमा संरक्षण बंद होणे यासह अनेक बदल आजपासून लागू असतील.
फास्टॅग पासची सोय (FASTag Annual Pass)
15 ऑगस्ट 2025 पासून खासगी वाहन मालकांना नवीन फास्टॅग वार्षिक पास उपलब्ध होईल. या पासमध्ये 3,000 रुपये देऊन 200 टोल व्यवहार किंवा एक वर्षाची वैधता मिळेल, जे आधी पूर्ण होईल ते लागू राहील. वारंवार महामार्ग वापरणाऱ्यांसाठी हे किफायतशीर आणि सोयीचे ठरेल. हा पास अनिवार्य नाही, सध्याची फास्टॅग प्रणाली पूर्वीप्रमाणे चालू राहील. पास न घेणाऱ्यांना टोल प्लाझावर नियमित दराने पेमेंट करावे लागेल.
एसबीआय कार्डमध्ये बदल (SBI Credit Card)
11 ऑगस्ट 2025 पासून एसबीआय कार्ड को-ब्रँडेड क्रेडिट कार्डवरील मोफत हवाई अपघात विमा बंद होईल. एलिट आणि प्राइमसारख्या प्रीमियम कार्डधारकांसह काही प्लॅटिनम कार्डवर 1 कोटी आणि 50 लाख रुपये विमा संरक्षण बंद होईल. या बदलामुळे कार्डधारकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
युपीआय नियम सुधारणा (UPI transactions)
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने युपीआय प्रणाली सुधारण्यासाठी नवीन नियम जारी केले आहेत. शिल्लक तपासणीच्या विनंत्यांवर मर्यादा आणि ऑटोपे सुविधेचा वापर करणे, पत्ता पडताळणी करण्यासारख्या सुविधांवर नियंत्रण ठेवले जाईल. यामुळे व्यवहारांची कार्यक्षमता वाढेल.
पंजाब नॅशनल बँकेची सूचना
पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांना 8 ऑगस्ट 2025 पूर्वी बँक खात्यांचे केवायसी अपडेट करण्याचे आवाहन केले आहे. 30 जून 2025 पर्यंत प्रलंबित असलेल्या खात्यांसाठी ही अंतिम तारीख आहे. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार हे अपडेट करणे बंधनकारक आहे.