फ्लिपकार्ट पुन्हा भारतात! कंपनीचे मुख्यालय सिंगापूरहून देशात हलवणार, IPO लवकरच

Flipkart HQ

Flipkart HQ | वॉलमार्टच्या मालकीची फ्लिपकार्ट (Flipkart India HQ) ही भारतातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी सध्या आपलं मुख्यालय सिंगापूरहून (Singapore) पुन्हा भारतात हलवण्याच्या तयारीत आहे. दक्षिण आशियात ॲमेझॉनशी (Amazon) टक्कर देणारी ही कंपनी लवकरच भारतात IPO दाखल करणार असल्याची शक्यता आहे.

फ्लिपकार्टने एका निवेदनात माहिती दिली की, “हा बदल म्हणजे आमच्या उत्क्रांतीचं पुढचं पाऊल आहे, ज्यामुळे आमचं होल्डिंग स्ट्रक्चर आमच्या भारतीय ऑपरेशन्सशी आणि देशाच्या प्रचंड आर्थिक क्षमतेशी सुसंगत होईल.”

फ्लिपकार्टने 2007 मध्ये बेंगळुरूमधून सुरुवात केली होती. परंतु 2011 मध्ये करसवलती, गुंतवणूक आकर्षण आणि देशांतर्गत अडथळे टाळण्यासाठी कंपनीने आपलं मुख्यालय सिंगापूरमध्ये हलवलं होतं.

फ्लिपकार्टच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, “भारतात सुरू झालेली आणि वाढलेली कंपनी म्हणून, हे पुनर्स्थापन आमचं ग्राहक, विक्रेते आणि भागीदारांवर लक्ष केंद्रित करणं अधिक सुलभ करेल. तसेच भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या वाढीस चालना देण्यास मदत करेल.”

कंपनीने हे स्थलांतर मंजुरीच्या अधीन असल्याचं स्पष्ट केलं असून, कोणतीही ठराविक कालावधी जाहीर केलेली नाही. मात्र फ्लिपकार्टचा IPO पुढील वर्षात येण्याची शक्यता आहे.

PhonePe, Zepto आणि Groww सारख्यांचाही भारतात पुनरागमनाचा ट्रेंड

2022 मध्ये फ्लिपकार्टमधून वेगळी झालेली PhonePe कंपनीनेही आपलं मुख्यालय भारतात स्थापन केलं आहे.. Zepto आणि Groww या स्टार्टअप्सनी देखील IPOच्या तयारीसाठी मुख्यालय भारतात हलवलं आहे.

गेल्या वर्षी भारतात एकूण $70 अब्ज इतकं इक्विटी डील व्हॉल्यूम होतं, ज्यात $19 अब्ज IPOs होते. Goldman Sachs च्या मते, अनेक स्टार्टअप्स भारतात चांगलं valuation मिळेल या आशेने IPO साठी अमेरिका ऐवजी भारतात येत आहेत.

फ्लिपकार्टचं $36 अब्ज मूल्यांकन आणि गुगलची गुंतवणूक

2023 मध्ये फ्लिपकार्टने Google कडून $350 दशलक्षची गुंतवणूक मिळवली होती. एकूण $1 अब्ज निधी उभारण्याच्या प्रयत्नांपैकी ही एक मोठी भर होती. त्यावेळचे कंपनीचं एकूण मूल्यांकन $36 अब्ज इतकं झालं होतं.