India Foreign Exchange Rreserves | भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, 4 एप्रिल 2025 रोजी संपलेल्या आठवड्यात भारताच्या परकीय चलन साठ्यात (Forex Reserves) तब्बल $10.8 अब्जांची वाढ झाली असून एकूण रिझर्व्ह $676.3 अब्जांवर पोहोचले आहे. सलग पाचव्या आठवड्यात झालेली ही वाढ भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी (Indian Economy) सकारात्मक संकेत मानली जात आहे.
परकीय चलन मालमत्तेचा (India Foreign Exchange Rreserves) वाटा सर्वाधिक
या वाढीमागचे प्रमुख कारण म्हणजे परकीय चलन मालमत्तांमध्ये (Foreign Currency Assets) झालेली $9 अब्जांची वाढ. सध्या या मालमत्तेची एकूण रक्कम $574.08 अब्ज इतकी आहे. याशिवाय, देशाचा सुवर्ण साठा (Gold Reserve) देखील $1.5 अब्जांनी वाढून $79.36 अब्जांवर पोहोचला आहे.
स्पेशल ड्रॉइंग राइट्स (SDR) देखील $186 दशलक्षांनी वाढून $18.36 अब्ज इतके झाले आहेत. यासोबतच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडील (IMF) राखीव स्थितीतही सौम्य सुधारणा झाली आहे.
फॉरेक्स साठ्याचा स्थैर्यपूर्ण प्रभाव
आरबीआयच्या (RBI Data) माहितीनुसार, परकीय चलन बाजारातील हस्तक्षेप (Market Intervention) आणि भारतीय रुपयाच्या पुनर्मूल्यांकनामुळे (Currency Revaluation) ही वाढ झाली आहे. यापूर्वी सप्टेंबर 2024 मध्ये भारताचा फॉरेक्स साठा $704.88 अब्जांवर गेला होता, जो आतापर्यंतचा उच्चांक आहे.
मजबूत फॉरेक्स साठा रुपयाचे (Indian Rupee) मूल्य स्थिर ठेवण्यासाठी मदत करतो. गरज भासल्यास रिझर्व्ह बँक डॉलर विकून रुपयाला घसरण्यापासून वाचवू शकते, ज्याचा थेट परिणाम देशाच्या चलनविषयक स्थैर्यावर होतो.
व्यापार तुटीतही घट; अर्थव्यवस्थेला दिलासा
दरम्यान, वाणिज्य मंत्रालयाच्या (Commerce Ministry) फेब्रुवारी 2025 च्या आकडेवारीनुसार, भारताची व्यापार तूट (Trade Deficit) $14.05 अब्जांवर आली असून ती गेल्या तीन वर्षांतील सर्वात कमी आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे निर्यातीत स्थैर्य आणि आयातीत झालेली घसरण. यामुळे जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही भारताची आर्थिक घडी सावरण्यात यश आल्याचे दिसते.