Small Savings Schemes Interest Rates | सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) आणि इतर छोट्या बचत योजना या सर्वसामान्यांसाठी गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे. या सरकारी योजनांमध्ये अनेकजण गुंतवणूक करतात. मात्र, आता सरकारने या तिमाहीत देखील योजनांवरील व्याजर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताच्या अर्थ मंत्रालयाने 30 जून 2025 रोजी जाहीर केले की, या योजनांवरील व्याजदर 1 जुलै 2025 पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्ष 2025-26 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी (जुलै ते सप्टेंबर) स्थिर ठेवण्यात आले आहेत. सलग सहाव्या तिमाहीत या योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. या निर्णयामुळे घरगुती बचतीला प्रोत्साहन मिळेल आणि गुंतवणूकदारांना स्थिर परतावा मिळत राहील.
कोणत्या योजनेला किती व्याजदर?
अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, खालील छोट्या बचत योजनांचे व्याजदर जुलै ते सप्टेंबर 2025 या कालावधीसाठी कायम ठेवण्यात आले आहेत:
- सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF): 7.1 टक्के व्याजदर, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी स्थिर पर्याय.
- सुकन्या समृद्धी योजना: मुलींच्या भविष्यासाठी 8.2 टक्के व्याजदर.
- 3 वर्षांची मुदत ठेव योजना: 7.1 टक्के व्याजदर, मध्यम मुदतीच्या गुंतवणुकीसाठी योग्य.
- टपाल कार्यालय बचत ठेव योजना: 4 टक्के व्याजदर, सुरक्षित आणि सुलभ बचत पर्याय.
- किसान विकास पत्र (KVP): 7.5 टक्के व्याजदर, 115 महिन्यांत परिपक्वता.
- राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC): 7.7 टक्के व्याजदर, कर बचत आणि स्थिर परतावा.
- मासिक उत्पन्न योजना (MIS): 7.4 टक्के व्याजदर, नियमित उत्पन्नासाठी आदर्श.
या योजना मुख्यत्वे टपाल कार्यालये आणि बँकांद्वारे उपलब्ध आहेत. शेवटचा व्याजदर बदल जानेवारी-मार्च 2024 मध्ये काही योजनांसाठी करण्यात आला होता.
व्याजदर स्थिर ठेवण्याचे कारण
रिपोर्टनुसार, सरकारने शेअर बाजारासारख्या पर्यायी गुंतवणुकींच्या तुलनेत छोट्या बचत योजना आकर्षक ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे घरगुती बचत वाढण्यास मदत होईल. स्थिर व्याजदरामुळे गुंतवणूकदारांना जोखीममुक्त परतावा मिळत राहील, विशेषतः PPF आणि सुकन्या समृद्धी योजनांसारख्या दीर्घकालीन योजनांमधून फायदा होतो.
छोट्या बचत योजना सामान्य नागरिकांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणूक पर्याय मानल्या जातात. PPF आणि NSC सारख्या योजनांना कर सवलतींचा (Tax Benefits) फायदा मिळतो, तर सुकन्या समृद्धी योजनेमुळे मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी आर्थिक नियोजन सुलभ होते.