TCS on luxury goods | नवीन आर्थिक नियमांच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून, आयकर विभागाने (Income Tax Department) 10 लाख रुपयांहून अधिक किमतीच्या विविध लक्झरी वस्तूंवर (Luxury Goods) 1 टक्का ‘टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स (TCS)’ लागू केला आहे.
ज्या लक्झरी वस्तूंवर 1 टक्के टीसीएस लागू करण्यात आला आहे त्यामध्ये महागडी मनगटी घड्याळे. हँडबॅग्स, पुरातन वस्तू , चित्रे व शिल्पकला, सनग्लासेस, होम थिएटर सिस्टीम, बूट आणि स्पोर्ट्सवेअर यांचा समावेश आहे.
ही तरतूद मूळतः जुलै 2024 च्या अर्थसंकल्पात (Budget) जाहीर करण्यात आली होती. सुरुवातीला 1 जानेवारीपासूनच लागू होणार होते, मात्र अलीकडेच 22 एप्रिलला अधिकृत अधिसूचनेत या वस्तू स्पष्टपणे नमूद करण्यात आल्या.
कर विभागाच्या मते, या निर्णयामुळे महागड्या खरेदीवर लक्ष ठेवणे, संभाव्य करचुकवेगिरी टाळणे आणि खरेदीदारांची आयकर प्रोफाइल तपासणे सोपे होणार आहे. विक्रेत्यांनी ही TCS रक्कम खरेदीच्या वेळीच वसूल करून सरकारकडे जमा करावी लागेल.
अधिसूचित वस्तू (TCS लागू असलेल्या):
- 10 लाखांहून अधिक किमतीची कोणतीही घड्याळे, चित्रे, शिल्पे किंवा पुरातन वस्तू (Wrist Watches, Paintings, Sculptures, Antiques)
- संग्रहणीय वस्तू – नाणी, स्टॅम्प्स
- नौका (Yachts), रोइंग बोट, हेलिकॉप्टर
- सनग्लासेस (Sunglasses), लक्झरी बॅग्स (Handbags)
- स्पोर्ट्सवेअर व उपकरणे (Sportswear) – स्की-वेअर, गोल्फ किट्स
- होम थिएटर सिस्टीम (Home Theatre Systems)
- रेसिंग व पोलोसाठी घोडे
2024-25 च्या अर्थसंकल्पात आयकर कायद्याच्या कलम 206C मध्ये सुधारणा करून यासाठी पायाभूत तरतूद केली आहे. मोटार वाहनांप्रमाणे इतरही महागड्या वस्तूंवर TCS लागू करून कर आधार वाढवण्याचा सरकारचा उद्देश आहे.