अभिषेक नायर पुन्हा KKR सोबत, BCCI कडून वगळल्यानंतर मिळाली मोठी संधी

Abhishek Nayar rejoins KKR

Abhishek Nayar rejoins KKR | भारतीय क्रिकेट संघाच्या (Indian cricket team) सहाय्यक प्रशिक्षकपदावरून हटवल्यानंतर अभिषेक नायरने गतवर्षीच्या आयपीएल विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सच्या (Kolkata Knight Riders) कोचिंग टीममध्ये पुनरागमन केलं आहे.

टीम इंडियाच्या (Team India) ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील (Australia tour) अपयशानंतर बीसीसीआयने (BCCI) त्यांच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठे बदल केले होते आणि त्याचाच एक भाग म्हणून नायर यांना हटवलं गेलं होतं. त्यानंतर आता नायर पुन्हा आयपीएलमध्ये कोलकाता संघाच्या ताफ्यात परतला आहे.

रिपोर्टनुसार, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात नायरचा सहाय्यक प्रशिक्षकपदावरील कार्यकाळ आठ महिन्यांपेक्षाही कमी होता. “अभिषेक नायर पुन्हा एकदा आमच्या सपोर्ट स्टाफमध्ये सामील झाला आहे. तो आज ईडन गार्डन्सवर सरावासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे,” असं फ्रँचायझीने घोषणा करताना माहिती दिली,

यापूर्वीही गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली नायर KKR टीमसोबत होते. IPL 2024 मध्ये त्याने महत्त्वाची भूमिका बजावत संघाला जेतेपद मिळवून दिलं होतं. याच यशानंतर गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक तर नायर सहाय्यक प्रशिक्षक झाला. मात्र, काही महिन्यांतच नायरला पदावरून दूर करण्यात आले.

नायरसह स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग ट्रेनर सोहम देसाई आणि फील्डिंग कोच टी दिलीप यांनाही संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला . बीसीसीआयच्या जानेवारीमधील आढावा बैठकीनंतर हे बदल झाले. त्यावेळी संघाच्या कामगिरीबरोबरच अंतर्गत वाद, संघातील नाराजी आणि कोचिंग स्टाफमधील मतभेद यावरही चर्चा झाली होती. त्यानंतरच एप्रिलमध्ये नायरला पदावरून हटवल्याचं स्पष्ट झालं.