Brian Lara on Virat Kohli Retirement | भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. त्यापाठोपाठ आता स्टार फलंदाज विराट कोहली देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यातच आता वेस्ट इंडिजचे महान फलंदाज ब्रायन लारा (Brian Lara) यांनी विराटला (Virat Kohli) कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला आहे.
तसेच, लारा यांनी 36 वर्षीय कोहली भविष्यात कसोटी क्रिकेटमध्ये 60 च्या आसपास सरासरी राखू शकतो, असे म्हटले आहे.
माजी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) अलीकडेच कसोटी क्रिकेटमधून तातडीने निवृत्ती घेतल्यानंतर कोहलीने देखील बीसीसीआयला (BCCI) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, विराट अथवा बीसीसीआयकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने कोहलीला निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली. हे वृत्त प्रसिद्ध होताच ब्रायन लाराने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत कोहलीला निवृत्त होऊ नये, असा आग्रह केला.
“कसोटी क्रिकेटला विराटची गरज आहे!! त्याचे मन मन वळवले जाईल. तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार नाही. त्याच्या उर्वरित कसोटी कारकिर्दीत 60 पेक्षा जास्त सरासरी राखेल,” अशी पोस्ट लाराने इंस्टाग्रामवर केली.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अलीकडील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत कोहलीचा फॉर्म चांगला नव्हता पर्थ कसोटीत कोहलीने शानदार शतक झळकावले होते, ज्यामुळे भारताने 295 धावांनी विजय मिळवला होता. मात्र, उर्वरित सामन्यात विराट मोठी खेळी करू शकला नाही. ही मालिका भारताने 1-3 अशा फरकाने गमावली.
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला 20 जून रोजी सुरुवात होणार आहे. यासाठी लवकरच बीसीसीआयकडून संघाची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार कोण असेल व विराट कोहली संघात असणार की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.