French Open Final | स्पेनचा दिग्गज टेनिसपटू कार्लोस अल्काराझने (Carlos Alcaraz) जागतिक क्रमवारीत नंबर 1 असलेल्या जानिक सिनरला (Jannik Sinner) हरवून फ्रेंच ओपन (French Open) टेनिस स्पर्धेचे पुरुष एकेरीचे जेतेपद (Men’s Singles Title) पटकावले आहे. क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकवर असलेल्या आणि गतविजेता कार्लोस अल्काराझने दोन सेट गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन करत अव्वल मानांकित सिनरला पाच सेटपर्यंत चाललेल्या अटीतटीच्या लढतीत हरवून हा किताब आपल्या नावावर केला.
जगातील दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू असलेल्या स्पेनच्या अल्काराझने तीन मॅच पॉईंट्स (Match Points) वाचवत अव्वल मानांकित सिनरला 5 तास 29 मिनिटांच्या लढतीत 4-6, 6-7, 6-4, 7-6, 7-6 अशा फरकाने पराभूत केले. या विजयामुळे इटलीच्या सिनरची ग्रँड स्लॅम स्पर्धेतील सलग 20 विजयांची मालिका थांबली. सिनरने गेल्या वर्षी यूएस ओपन आणि या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनचेविजेतेपद जिंकले होते आणि पॅरिसमध्ये ग्रँड स्लॅम विजयांची हॅटट्रिक पूर्ण करण्याकडे त्याचे लक्ष होते.
कार्लोस अल्काराझचा 5 वा ग्रँड स्लॅम
अल्काराझचा हा पाचवा ग्रँड स्लॅम किताब आहे, तर सिनरच्या नावावर तीन ग्रँड स्लॅम किताब आहेत. अल्काराझने आतापर्यंत कोणताही ग्रँड स्लॅम फायनल गमावला नाही, तर सिनरला पहिल्यांदाच ग्रँड स्लॅमच्या अंतिम लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. बावीस वर्षीय अल्काराझचा या वर्षी क्ले कोर्टवरविजय-पराभवाचा विक्रम 22-1 असा झाला आहे. त्याने 23 वर्षीय सिनरविरुद्ध सलग पाचव्या विजयासह एकूण आठवा विजय नोंदवला. सिनरने चार वेळा अल्काराझला हरवले आहे.
अल्काराझचे दमदार पुनरागमन
अल्काराझ चौथ्या सेटमध्ये पराभवाच्या उंबरठ्यावर होता, परंतु त्याने तीन मॅच पॉईंट्स वाचवून सामना निर्णायक सेटमध्ये नेला आणि नंतर तो 7-6 असा जिंकून सामना आणि किताब आपल्या नावावर केला. पाचव्या सेटच्या टायब्रेकमध्ये अल्काराझने शानदार सुरुवात करत 7-0 अशी मोठी आघाडी घेतली आणि नंतर सहजपणे विजय मिळवला. चौथ्या सेटमध्ये अल्काराझ 3-5 च्या स्कोरनंतर 0-40 ने पिछाडीवर होता, पण नंतर त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्याला मागे टाकले आणि टायब्रेकरमध्ये 7-6 ने विजय मिळवला. अव्वल मानांकित सिनरने सुरुवातीचे दोन सेट 6-4, 7-6 असे जिंकले होते, तर अल्काराझने तिसरा सेट 6-4 असा जिंकून सामन्यात आपल्या पुनरागमन केले.
यापूर्वी, शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या उपांत्य फेरीत इटलीच्या जानिक सिनरने सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला 6-4, 7-5, 7-6 (3) असे हरवले. सिनरने तीन तास 16 मिनिटे चाललेल्या या सामन्यात आपला विजय निश्चित केला. सिनरचा जोकोविचविरुद्ध सलग चौथा विजय होता. या पराभवासह जोकोविचच्या विक्रमी 25 व्या ग्रँड स्लॅम किताब जिंकण्याची प्रतीक्षा वाढली आहे. सिनर 1968 मध्ये सुरू झालेल्या ओपन युगात फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचणारा इटलीचा दुसरा पुरुष खेळाडू ठरला आहे. यापूर्वी 1976 चे विजेते एड्रियानो पनाटा अंतिम फेरीत पोहोचले होते.